अकरा दिवसांत कोल्हापूर शहरातील दहा हजार टन कचरा, गाळ उचलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:47 PM2019-08-22T13:47:20+5:302019-08-22T13:49:44+5:30
कोल्हापूर शहरातील महापूर ओसरल्यानंतर रोगराईचा फैलाव होऊ नये म्हणून महानगरपालिका आरोग्य विभागाने तातडीने शहर स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, गेल्या ११ दिवसांत अंदाजे तब्बल १० हजार २०० टन कचरा तसेच गाळ उठाव केला असून, ही मोहीम आणखी आठ ते दहा दिवस चालेल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.
कोल्हापूर : शहरातील महापूर ओसरल्यानंतर रोगराईचा फैलाव होऊ नये म्हणून महानगरपालिका आरोग्य विभागाने तातडीने शहर स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, गेल्या ११ दिवसांत अंदाजे तब्बल १० हजार २०० टन कचरा तसेच गाळ उठाव केला असून, ही मोहीम आणखी आठ ते दहा दिवस चालेल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.
शहरात सोमवारी (दि. ५) पंचगंगेच्या महापुराचे पाणी शिरले. अनेक वसाहतींत घरांना पाण्याने घेरले. अतिवृष्टी आणि महापुरामुळे चौदा हजार कुटुंबांतील जवळपास ४० हजार व्यक्तींना स्थलांतरित व्हावे लागले. आतापर्यंतच्या पुरात यंदाचा महापूर सर्वांत मोठा होता. लोकांचे अतोनात नुकसान झाले. घरातील प्रापंचिक वस्तू, इलेक्ट्रिक वस्तू, कपडे, अंथरूण, अन्नधान्य पुराच्या पाण्यात पाच दिवस राहिल्यामुळे खराब झाले. पूरग्रस्त भागांत चिखलाचे मोठे साम्राज्य निर्माण झाले होते.
शनिवारी (दि. १०) महापुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तत्काळ महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पूर ओसरेल तशी स्वच्छता मोहीम गतिमान केली. आरोग्य विभागाने ११ विभागांची पथके तयार करून त्या-त्या भागात कचरा उठाव, गाळ-चिखल उठाव तसेच रोगराई पसरू नये म्हणून औषध व धूर फवारणी मोहीम हाती घेतली.
सुरुवातीला या कामासाठी ४०० कर्मचारी तैनात करण्यात आले. नंतर ही संख्या ७५० पर्यंत वाढविली. याशिवाय स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, विद्यार्थी असे रोज २०० ते २५० जण या मोहिमेत सहभागी होत होते. देवस्थान समिती, मुंबई महानगरपालिका, रत्नागिरी नगरपालिका, बी व्ही जी इंडिया ग्रुप, आर्ट आॅफ लिव्हिंग, अप्पासाहेब धर्माधिकारी फौंडेशन यांचे स्वयंसेवक, न्यू कॉलेज, महावीर कॉलेज, पुण्याच्या आॅल इंडिया शिवाजी मेमोरियलच्या विद्यार्थ्यांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
गेल्या ११ दिवसांत शहरातील पूरग्रस्त भागातून १०२० डंपर कचरा व गाळ उठाव करण्यात आला. प्रत्येक डंपरमध्ये सरासरी दहा टन कचरा सामावला जातो. या हिशेबाने १० हजार २०० टन कचरा उचलला गेला. महापुरानंतर रस्त्यावर आलेल्या कचऱ्यापैकी ८० टक्के कचरा, गाळ व खरमाती उचलण्यात आली आहे. अद्यापही २० टक्के उठाव बाकी आहे. त्यामुळे ही मोहीम आणखी आठ ते दहा दिवस सुरू राहणार आहे.
सामाजिक जाणिवेचे भान
कोल्हापूर शहरावर ओढवलेले महापुराचे संकट दूर झाल्यानंतर शहरातील स्वच्छता आणि कचरा उठावाचे एक मोठे आव्हान होते. संभाव्य रोगराईवर नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे होते. मात्र महापालिकेच्या प्रशासनाला हे आव्हान पेलवणारे नव्हते. शहरातील अनेक दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सरकारी, निमसरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात देत स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.
आयुक्त कलशेट्टी यांच्यासह शाहू छत्रपती, पोलीस अधीक्षक डॉॅ. अभिनव देशमुख, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, मालोजीराजे, मधुरिमाराजे यांनीही सामाजिक जाणिवेच्या कल्पनेतून या मोहिमेत भाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडले.