Kolhapur: अकरा महिन्याच्या बालकाचा गटारीत पडून मृत्यू, परिसरात हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 07:11 PM2024-06-25T19:11:40+5:302024-06-25T19:12:22+5:30
त्याला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला
इचलकरंजी : चंदूर (हातकणंगले) येथे अवघ्या अकरा महिन्याच्या बालकाचा घरासमोरील गटारीत पडून मृत्यू झाला. शौर्य सतीश पुजारी असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे. याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, चंदूर येथील महासिद्ध मंदिर समोरून जाणाºया जुन्या बाजार रस्त्यावर पुजारी कुटुंबीय राहण्यास आहेत. अभियंता असलेल्या सतीश पुजारी यांचा ११ महिन्याचा मुलगा शौर्य मंगळवारी घरात नेहमीप्रमाणे खेळत होता. बघताबघता घरातील लोकांची नजर चुकवून तो उंबरा ओलांडून बाहेर गेला आणि घरासमोर असलेल्या गटारीत पडला. गटार तुंबून गाळ साचलेली असल्याने तो बुडाला.
शौर्य दिसेनासे झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. काही वेळातच घरासमोरील गटारीत पडल्याचे आढलले. त्याला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शौर्य हा गुटगुटीत आणि देखणा होता. त्याचा गटारीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत असून, आयजीएम रुग्णालय परिसरात पुजारी यांचे नातेवाइक आणि मित्र परिवाराने गर्दी केली होती.