अकरा संक्षिप्त बातम्यांचा पट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:50+5:302021-06-04T04:18:50+5:30
कोल्हापूर : येथील सामाजिक कार्यकर्ते नेपोलियन सोनुले यांनी थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून परिसरातील दोन हजार घरांमध्ये आठ दिवस ...
कोल्हापूर : येथील सामाजिक कार्यकर्ते नेपोलियन सोनुले यांनी थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून परिसरातील दोन हजार घरांमध्ये आठ दिवस पुरेल इतका भाजीपाला देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. आई-वडिलांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना महामारीमध्ये हे सेवाकार्य करण्यात येत असल्याचे सोनुले यांनी सांगितले. या उपक्रमामुळे नागरिकांचीही धावपळ वाचली.
मास्क वाटप
कोल्हापूर : येथील टाकाळा परिसरातील मदिना मोहल्ला सहारा ग्रुपच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुकादम यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझर बॉटल वाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शौकत जमादार, आदिल मुकादम, दस्तगीर नाईकवडे, सलमान वडगावकर आदी उपस्थित होते.
कचरावेचक महिलांना वस्तू वाटप
कोल्हापूर : अवनि संस्थेतर्फे कचरावेचक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संस्थेने आतापर्यंत दीड हजार कुटुंबीयांना अशा किटचे वाटप करण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यांत चार हजार कुटुंबांना किटचे वाटप करण्यात येणार आहे. याचा लाभ कचरावेचक महिला, गरीब गरजू, विधवा, परित्यक्ता, होतकरू महिला यांना होत आहे.
अर्सेनिक अल्बमचे वाटप
कोल्हापूर : येथील मंथन फाउंडेशन व रौनक शहा फाउंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या संघवी मीनाबाई पोपटलाल शहा हॉस्पिटलतर्फे शंभर घरांमध्ये गरीब, गरजू रुग्णांना अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी हा उपक्रम राबविल्याचे डॉ. रवींद्र वराळे यांनी सांगितले. या वेळी डॉ. विवेक भोईटे, नेताजी कदम, कायनात मुल्ला, सुनील सुतार, स्नेहा सातपुते आदी उपस्थित होते.
अण्णा हजारे गप्प का..?
कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गप्प का आहेत? अशी विचारणा कोल्हापूर जिल्हा सर्वोदय मंडळाचे विश्वस्त सुंदर देसाई यांनी केली आहे. जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटना, सर्वोदय मंडळ, खादी ग्रामोद्योग संघातर्फे मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीत ते बोलत होते.
एकेकाळी लोकपाल आंदोलनासंदर्भात हजारे यांनी दिल्ली गाजवली आणि आता मराठा आरक्षण, वाढलेली महागाई, खासगीकरण या प्रश्नांवर मात्र ते मूग गिळून गप्प का आहेत. या वेळी व्ही. डी. माने, छायाताई भोसले, डी. डी. चौगले आदी उपस्थित होते.
घोड्यांना चारा वाटप
कोल्हापूर : पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या शहर शाखेतर्फे कोल्हापुरातील ३० घोड्यांना ओला चारा वाटप करण्यात आला. बेवारस कुत्र्यांना खाऊ घालण्यात आला. सोमनाथ घोडेराव यांनी हा उपक्रम राबविला. कोरोनाच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क, पाणी बाटल्या, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या वेळी सुखदेव बुधीहाळकर, शब्बीर शेख, कुमार थोरात आदी सहभागी झाले.
कोरोना केंद्रास मदत
कोल्हापूर : पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील कोविड केंद्रास रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून त्यातून ऑक्सिमीटर, थर्मामीटर गन, वेट मशीन, सॅनिटायझर असे साहित्य भेट दिले. या वेळी प्रांताधिकारी प्रसन्नजित प्रधान, कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, शाहू साखर कारखान्याचे संचालक सचिन मगदूम आदी उपस्थित होते.
रेडझोनमधील बांधकामे थांबवा
कोल्हापूर : पुलाची शिरोली हद्दीत सर्व्हे क्रमांक २९ मध्ये जागामालकांनी बेकायदेशीर बांधकाम केले असून, त्यावर कारवाई करावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जितेंद्र कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या बांधकामासाठी त्यांनी ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतलेली नाही. टाकलेल्या मुरुमाची शासनाकडे स्वामित्व धन भरलेले नाही. तिथे हेवी शेड व सिमेंट क्राँकीटचे खांब उभारले आहेत. हा परिसर रेडझोनमध्ये असल्याने हे धोकादायक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गरजूंना धान्य किट वाटप
कोल्हापूर : येथील ब्रदर्स इन आर्मस संस्थेच्यावतीने गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन गरजूंना हे वाटप केल्याचे गजेंद्र बकाले यांनी सांगितले. तांदूळ, साखर, कडधान्यांसह बिस्कीटच्या पुड्यापर्यंत किमान १२ वस्तू एका किटमध्ये होत्या.
चप्पल कारागिरांना मदत करा
कोल्हापूर : चप्पल कारागिरांना आर्थिक मदत करण्याची मागणी लोकराज्य जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. पक्षाचे प्रमुख अनिल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यासंबंधीचे निवेदन हस्तकला सेवा केंद्राच्या संचालकांना देण्यात आले. कोरोनामुळे व्यवहार बंद असल्याने रस्त्यावर बसून चप्पल दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षाचालकांना जशी मदत दिली तशीच मदत या बांधवांनाही द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी विश्वनाथ पाटील, बाळकृष्ण गवळी, राहुल घोटणे, शशिकांत जाधव, संतोष बिसुरे आदी उपस्थित होते.
दोन घास भुकेल्यांसाठी
कोल्हापूर : येथील बापूरामनगरातील मैत्री फाउंडेशन संचलित सतेज पाटील ग्रुपच्यावतीने ‘दोन घास भुकेल्यां’साठी हा उपक्रम राबवण्यात आला. सुमारे आठशेंवर कुुटुंबांना ही मदत देण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात स्वत:च्या घरातील डबे गोळा करून सीपीआरमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आले. पहिल्याच दिवशी २२ डबे जमा झाले. ही माहिती समजल्यावर कॉलनीतून अनेक लोक पुढे आले. त्यातून रोज दीडशे डबे पोहचवले जातात. १४ मे पासून हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी कळंब्यातील चव्हाण हॉटेलचे मालक शामराव चव्हाण, रिक्षाचालक संजय अकोळकर यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत शिंदे व त्यांचे सहकारी हे पुण्याईचे काम करतात.