‘अकरावी’ची प्रवेश प्रक्रिया १६ जूनपासून
By admin | Published: June 9, 2015 01:04 AM2015-06-09T01:04:36+5:302015-06-09T01:19:23+5:30
केंद्रीय पद्धत : उद्बोधन वर्ग शुक्रवारपासून
कोल्हापूर : दहावीचा आॅनलाईन निकाल लागल्यानंतर मुलांना आता महाविद्यालयाचे वेध लागले आहे. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची सुरुवात १६ जूनपासून होणार आहे. शहरातील ३२ महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रबोधनाचे वर्ग शुक्रवारपासून (दि. १२) सुरू होतील, अशी माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष व शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी दिली.
गोंधळी म्हणाले, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या माध्यमातून तयारी सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र यावर्षी गोखले कॉलेज राहणार आहे. कोल्हापूर शहरात मराठी आणि इंग्रजी माध्यमांची एकूण ३२ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यांची एकत्रित प्रवेश क्षमता १३ हजार ५०० इतकी आहे.
दहावीच्या टक्केवारीवर प्रवेशाची सूत्रे निश्चित केली असल्याने समितीकडून वाढीव प्रवेश क्षमतेचे नियोजन करण्यात येईल. आॅप्टिकल मार्क रीडर (ओएमआर) पद्धतीने यावर्षी शहरातील अकरावीचे प्रवेश निश्चित केले जातील. विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याच्या ६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेची, महाविद्यालयांची माहिती ठेवली आहे. ‘एमसीव्हीसी’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. महाविद्यालयांना प्राधान्यक्रम देताना विद्यार्थी-पालकांनी ते लक्षात ठेवावे.
महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेबाबत लिपिक, शिक्षक आणि अर्ज वितरण व संकलन केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी तसेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे उद्बोधन वर्गाचे आयोजन केले असून हे वर्ग शुक्रवार (दि. १२) ते रविवार (दि. १४) दरम्यान घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)