‘मोबाईल अॅप्स्’वर अकरावी प्रवेशाची माहिती
By admin | Published: May 24, 2016 11:35 PM2016-05-24T23:35:09+5:302016-05-25T00:25:35+5:30
राजाराम महाविद्यालय मुख्य केंद्र : केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून तयारीला वेग
कोल्हापूर : शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता निर्माण करणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया यावर्षी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवे पाऊल टाकणार आहे. विद्यार्थी, पालकांना त्यांच्या हातातील स्मार्टफोनवर मोबाईल अॅप्स्द्वारे यंदा प्रवेशाची अद्ययावत माहिती (अपडेटस्) मिळणार आहे. त्यादृष्टीने प्रवेश प्रक्रिया समितीची तयारी सुरू आहे.
अकरावी प्रवेशासाठी शहरातील ३२ महाविद्यालयांमधील यावर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रक्रियेचे यंदाचे सातवे वर्ष असून राजाराम महाविद्यालय मुख्य केंद्र आहे. ओएमआर शीट, संकेतस्थळानंतर आता मोबाईल अॅप्स्चा वापर केला जाणार आहे. प्रवेश अर्ज वितरण-स्वीकृती केंद्रे, प्रवेशाचे वेळापत्रकाच्या निश्चितीवर समितीतर्फे ३१ मेच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. कोल्हापूर शहरात मराठी व इंग्रजी माध्यमांची एकूण ३२ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांची एकत्रित प्रवेश क्षमता १३,५०० इतकी आहे. दहावीच्या गुणपत्रिका मिळाल्यानंतर साधारणत: जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, प्रक्रियेबाबत शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी सांगितले की, गेल्यावर्षीप्रमाणे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याच्या (६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ) या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेची, महाविद्यालयांची माहिती मिळेल.
मोबाईल अॅप्स् ठरणार उपयुक्त
प्रवेश प्रक्रियेची माहिती देणारे हे मोबाईल अॅप्स् मराठी भाषेमध्ये असणार आहे. त्यात गुणवत्ता यादी, प्रवेश मिळालेले महाविद्यालय, प्रवेशित झालेल्या जागा, आदींची माहिती मिळणार आहे. ‘गुगल’च्या प्ले स्टोअरवरून हे अॅप्स् विद्यार्थी, पालकांना विनामूल्य डाऊनलोड करून घेता येणार आहे. त्याच्या वापरासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन ते दिवसांत संबंधित अॅप्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी, पालकांवर मोठा ताण असतो. हा ताण हलका करण्यासाठी मोबाईल अॅप्स् उपयुक्त ठरणार असल्याचे प्रवेश प्रक्रिया समितीचे कार्याध्यक्ष डॉ. वसंत हेळवी यांनी सांगितले. ते म्हणाले, राजाराम महाविद्यालयाला यंदा पहिल्यांदाच अकरावी प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.