अकरावीच्या विद्यार्थ्यांना आज प्रवेशाचे महाविद्यालय समजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:28 AM2021-09-07T04:28:54+5:302021-09-07T04:28:54+5:30
विद्याशाखानिहाय राज्य शासनाने मंजूर केलेल्या प्रवेश क्षमतेनुसारच महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश होणार आहेत. यावर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे एकूण ९८०६ ...
विद्याशाखानिहाय राज्य शासनाने मंजूर केलेल्या प्रवेश क्षमतेनुसारच महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश होणार आहेत. यावर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे एकूण ९८०६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या छाननीची प्रक्रिया राबवून समितीने निवड यादी तयार केली आहे. ती मंगळवारी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर समितीकडून विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविण्यात येईल. त्यामध्ये पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जावून त्यांना मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती घ्यावी, असा उल्लेख राहील. उर्वरित विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळणार असल्याचा एसएमएस जाईल, अशी माहिती प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी सोमवारी सांगितले.
दुसऱ्या फेरीत संधी
मंजूर प्रवेश क्षमतेनुसार महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश होतील. पहिल्या फेरीत ज्यांनी अर्ज केले नाहीत. ज्यांचे अर्ज अपात्र ठरले त्यांनी दुसऱ्या फेरीमध्ये अर्ज करता येणार आहे.
महाविद्यालयांना जाणार नावे
निवड यादी जाहीर झाल्यानंतर शहरातील ३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शाखानिहाय प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी संबंधित महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून ऑनलाईन स्वरूपात पाठविली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी महाविद्यालयांनी त्या यादीची प्रिंट काढून त्यांच्या नोटीस फलकावर लावायची आहे. समितीच्या सूचनेनुसार महाविद्यालयांनी प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही करायची असल्याचे सुभाष चौगुले यांनी सांगितले.