‘सीपीआर बचाव’साठी पुन्हा आंदोलनाचा ‘एल्गार’
By admin | Published: December 15, 2015 12:10 AM2015-12-15T00:10:04+5:302015-12-15T00:29:01+5:30
कृती समिती : गुरुवारपासून प्रारंभ; शेवटची मागणी मान्य होईपर्यंत लढा
कोल्हापूर : सर्वसामान्य रुग्णांचा आधार असलेल्या ‘सीपीआर’मधील (छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय) सुविधांची पूर्तता आणि स्थिती सुधारण्यासाठी सीपीआर बचाव कृती समितीने आंदोलनाचा पुन्हा ‘एल्गार’ सोमवारी पुकारला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुरुवार (दि. १७)पासून आंदोलनाचा प्रारंभ करण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
येथील राजर्षी शाहू स्मारक भवनच्या कॉन्फरन्स् हॉलमध्ये ही बैठक झाली. दीड तासांहून अधिक वेळ चाललेल्या बैठकीत विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कृती समितीच्या सदस्यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याबाबत सूचना मांडल्या. अखेरीस समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी समितीने केलेल्या आंदोलनानंतर सीपीआर प्रशासन, राज्य शासनाकडून झालेली कार्यवाही आणि दुर्लक्ष याची माहिती दिली. यानंतर समितीच्या यापुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना सांगितले की, आवश्यक त्या सुविधा नसल्याने सीपीआरची दुरवस्था झाली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी समितीने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका निवडणुकीमुळे समितीच्या आंदोलनात खंड पडला होता; पण आता नव्या जोमाने आणि तीव्रतेने आंदोलन केले जाणार आहे. त्याची सुरुवात गुरुवारी (दि. १७) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली जाईल. यानंतर मंगळवारी (दि. २२) सीपीआर आवारात ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
बैठकीस मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे, ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई, ‘कॉमन मॅन’चे बाबा इंदुलकर, भाऊसो काळे, सुखदेव बुध्याळकर, महादेव पाटील, अवधूत पाटील, किशोर घाटगे, रमेश कारवेकर, चंद्रकांत चव्हाण, अशोक पुजारी, अशोक रानगे, बबलू फाले, शंकरराव शेळके, शिवाजीराव हिलगे, महादेव जाधव, संभाजी जगदाळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सिटी स्कॅन, एमआरआय, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका सुरू करण्यासह रक्त तपासणी विभागातील अनागोंदी थांबविण्यासाठी प्राधान्याने लढा देण्याची गरज आहे. -बाबा इंदुलकर
..............................................
पूर्णवेळ अधिष्ठाता मिळण्यासह सीपीआरमधील डॉक्टरांची बाहेरील रुग्णालये बंद करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. -उदय लाड
..............................................
प्रलंबित मागण्यांकडे सीपीआर प्रशासन, राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धडक आंदोलन
हाती घ्यावे. -सोमनाथ घोडेराव
..............................................
रुग्णांना आवश्यक असलेल्या तातडीच्या गरजांची पूर्तता होण्याबाबत आंदोलन करावे.
-रमेश भोसकर
सीपीआर बचावसाठी जिल्हाभर जनजागृती करण्यासाठी तालुकानिहाय मेळावे घ्यावेत.
-कृष्णात पवार
..............................................
व्हेंटिलेटर, सिटी स्कॅन, कॅथलॅब सुविधांच्या पूर्ततेसाठी आंदोलनातून आग्रह धरावा. -महादेव पाटील
..............................................
सीपीआर परिसराची सुरक्षा आणि बेशिस्त पार्किंगचा मुद्दा आंदोलनात घेण्यात यावा. -सुखदेव बुध्याळकर
..............................................
प्रत्येक संघटनेने सीपीआरमध्ये एक-एक दिवस आंदोलन करावे.
-भाऊसाहेब काळे
..............................................
निवेदन देऊन, चर्चा करून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे समितीने आंदोलनाची तीव्रता वाढवावी.
-फिरोजखान उस्ताद
‘लिफ्ट’साठी झोळीद्वारे पैसे मागा
सीपीआरमधील ‘लिफ्ट’ बंद असल्याने चौथ्या मजल्यापर्यंत जाताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची दमछाक होत असल्याचे बैठकीत काहीजणांनी सांगितले. त्यावर दिलीप देसाई यांनी प्रशासन याकडे लक्ष देणार नसेल तर झोळीद्वारे पैसे मागून लिफ्ट सुरू करण्यासाठी ते रुग्णालय प्रशासनाला देऊया, अशी सूचना केली. तसेच त्यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा गैरवापर करणारे रॅकेट हे समितीने उजेडात आणावे, असे आवाहन केले.