पवनचक्कीविरोधात एल्गार

By admin | Published: February 15, 2016 01:06 AM2016-02-15T01:06:33+5:302016-02-15T01:10:34+5:30

बोलोलीत बैठक : बारा वाड्यांंतील शेतकरी उद्या काम बंद पाडणार

Elgar against windmill | पवनचक्कीविरोधात एल्गार

पवनचक्कीविरोधात एल्गार

Next

सांगरूळ : सातेरी महादेवाच्या डोंगरावर बोलोली, स्वयंभूवाडी, उपवडे, आमशीच्या डोंगरमाथ्यावर रविवारी सकाळी अचानक पवनचक्की उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्याचे समजताच बारा वाड्या, वस्त्यांवरील शेतकऱ्यांनी बोलोली येथे रविवारी बैठक घेऊन पवनचक्की विरोधात एल्गार पुकारला. उद्या, मंगळवारी तेथील काम बंद पाडण्याचा निर्धार केला असून, गुरुवारी शासकीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
करवीर तालुक्यातील बारा वाड्या-वस्त्यांचा लांडी खोरी या नावाने प्रसिद्ध असणारा बोलोली उपवडेसह परिसर उंच डोंगरमाथ्यामुळे प्रसिद्ध आहे. तत्कालीन मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी उपवडेत लघुपाटबंधारे प्रकल्प बांधून परिसरात हरित क्र ांती निर्माण केली. यामुळे इथला शेतकरी सधन बनला; पण चार वर्षांत डोंगरमाथ्यावर चेन्नई, सातारा, कऱ्हाड येथील कंपन्यांनी राजकीय वरदहस्ताखाली शासकीय व शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून पवनचक्कीसाठी प्राथमिक स्वरूपाचे टॉवर उभे केले आहेत. दरम्यान, रविवारी अचानक पवनचक्कीच्या मुख्य कामाला सुरुवात करण्यात आली. यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणण्यासाठी रस्ता केला आहे, तर वेगवेगळ्या मशीनद्वारे जमिनीची व हवेच्या दाबाची तपासणी केली.
दरम्यान उद्या, या प्रकल्पाचे काम बंद पाडून आंदोलन करण्याचे बैठकीत ठरले. बैठकीला महादेव राणे, चंद्रकांत शिपेकर, देवबा राणे, लहू बाटे, विलास बाटे, सुनील कारंडे, संजय कारंडे, यशवंत पाटील, कृष्णात पाटील, संभाजी इर्गुले, भरत बाटे, सागर राणे यांच्यासह धनगरवाडा, शिपेकरवाडी, आरडेवाडी, इर्गुलेवाडी, कारंडेवाडी, स्वयंभूवाडी, विठ्ठलाईवाडी, अशा बारा वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची मागणी : दुष्काळ लादू नका
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उपवडे तलावही पूर्ण क्षमतेने भरला नाही. दुष्काळसदृश परिस्थिती असताना पवनचक्की उभारण्याचा घाट कशासाठी? अशी शेतकऱ्यांतून विचारणा होत आहे. हा पवनचक्की प्रकल्प शासनाचा की खासगी कंपन्यांचा, हाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. सध्या या डोंगरावर शतकोटी वृक्ष लागवडीमुळे चांगले जंगल तयार झाले आहे. ही झाडे तोडून पवनचक्क्या उभा करून आम्हा शेतकऱ्यांवर दुष्काळ लादू नका, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Web Title: Elgar against windmill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.