कंत्राटी वीज कामगारांचा ‘कायम’साठी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2017 01:13 AM2017-05-09T01:13:28+5:302017-05-09T01:13:28+5:30
आम्ही कंत्राटी कामगार दुरुस्ती, देखभाल, वीज बिल वसुली, सबस्टेशन आॅपरेटिंग, बिलिंगची कामे गेली १२ वर्षे करत आहोत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेली दहा ते पंधरा वर्षे महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांमध्ये ‘कंत्राटी’ म्हणून कार्यरत असणाऱ्या कामगारांना ‘कायम करावे’ या मागणीसाठी जिल्ह्णातील कामगारांनी वीज विभागाच्या ताराबाई पार्कमधील कार्यालयासमोर सोमवारी दिवसभर धरणे धरले. या कामगारांच्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून केला.
या तिन्ही कंपन्यांमधून कायमस्वरूपी नोकरभरती करताना डावलले जात आहे. कंपनीला तीन वर्षे कंत्राटी असलेले विद्युत सहाय्यक चालतात मग कामगार का चालत नाहीत, असा सवाल यावेळी या कामगारांनी उपस्थित केला. पुणे, मुंबई, नागपूर येथे आंदोलने केली. आम्ही कंत्राटी कामगार दुरुस्ती, देखभाल, वीज बिल वसुली, सबस्टेशन आॅपरेटिंग, बिलिंगची कामे गेली १२ वर्षे करत आहोत. त्यामुळेच आज कंपनी फायद्यात आहे. त्यामुळे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्यांदा रानडे समिती त्यानंतर भाटिया समिती स्थापन केली. मात्र, २०१४ च्या विद्युत सहाय्यकाच्या निवडीवेळी पुन्हा कंत्राटी कामगारांवर अन्याय करण्यात आला.
याबाबत १५ मेपर्यंत निर्णय न झाल्यास २२ मेपासून निर्णय न झाल्यास कंत्राटी कामगार बेमुदत आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद कुडतरकर, मंडल सचिव अमल लोहार, कोषाध्यक्ष मधुकर माळी, अनिल लांडगे, रमेश थोरात, राजू जोशिलकर, भगवान खाडे, कॉ. कृष्णात तांबेकर यांच्यासह कामगार उपस्थित होते.
पगारही वेळेत नाही
आमच्या काही कामगारांचा आठ आठ महिने पगार नाही. १२००० रुपयांपर्यंत पगार असताना प्रत्यक्षात सात-साडेसात हजार रुपयेच आम्हाला दिले जातात, अशी व्यथा यावेळी काही कामगारांनी व्यक्त केली. या वयात आम्हाला ‘कंत्राटी’पेक्षा ‘रोजंदारी’वर घेऊन नंतर कायम करावे, ही माफक अपेक्षा करत आहोत असे या कामगारांनी सांगितले.