‘एफआरपी’साठी आज एल्गार

By admin | Published: November 5, 2015 09:49 PM2015-11-05T21:49:48+5:302015-11-05T23:50:28+5:30

‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेकडे लक्ष : जयसिंगपुरात एक लाख शेतकरी येणार

Elgar today for 'FRP' | ‘एफआरपी’साठी आज एल्गार

‘एफआरपी’साठी आज एल्गार

Next

जयसिंगपूर : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या चौदाव्या ऊस परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. या हंगामात एकरकमी एफआरपी द्या, अशी भूमिका संघटनेची असून, ऊस परिषदेला पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील एक लाख शेतकरी उपस्थित राहतील, असा दावा ‘स्वाभिमानी’ने केला आहे. आज दुपारी दोन वाजता येथील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या या परिषदेत आंदोलनाची दिशा ठरणार आहे. एफआरपीसाठी संघर्ष करायला तयार राहा, असे आवाहन स्वाभिमानीने केले असले तरी कारखानदारांनी साखरेचे दर घसरल्याचे कारण सांगून एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचे ठरविले आहे. यामुळे एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक झाली आहे. ही कोंडी कशी फुटणार याची उत्सुकता आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक साखर कारखाने वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर ठराव करून शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या एफआरपीचे तीन तुकडे करू पाहत आहेत. वास्तविक ऊस दर नियंत्रण अध्यादेश १९६६ नुसार उसाची एफआरपी अर्थात किमान लाभकारी मूल्य कायद्याप्रमाणे ऊस तोड झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत एकरकमी देणे सर्वच कारखानदारांना बंधनकारक आहे. एफआरपीचे तुकडे केल्यास त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. एफआरपीचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न केल्यास स्वाभिमानी आंदोलन छेडेल, तसेच प्रसंगी न्यायालयातही जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यंदा एकरकमी एफआरपीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्याची गरज असून, कारखान्यांनी शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी, असा सूर शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, स्वाभिमानीने ऊस परिषद यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. परिषदेला राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. यंदाची चौदावी ऊस परिषद ऐतिहासिक होण्याच्या दृष्टीने स्वाभिमानीने ठिकठिकाणी मेळावे, बैठका, मोटारसायकल रॅली काढून ऊस परिषदेची शेतकऱ्यांत जागृती केली आहे.

कोंडी कशी फुटणार ?: दिशा आज ठरणार
एफआरपीची सर्व रक्कम देणार, पण तीन टप्प्यांत देणार, अशी भूमिका साखर कारखानदारांची आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना एकरकमी एफआरपीसाठी आग्रही आहे.
केंद्रात व राज्यात भाजप सरकार असून, ‘स्वाभिमानी’ने सत्तेत असूनही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजप सरकार ही कोंडी कशी फोडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कोल्हापूरहून विशेष पथकासह शिरोळ, हातकणंगले, वडगाव, कुरुंदवाड पोलीस ठाण्यांतील कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहने बायपास रस्त्यावरून सोडण्यात येणार आहेत, तर इचलकरंजी व जयसिंगपूरला येणारी वाहने उदगाव-शिरोळ बायपास रोडवरून सोडण्यात येणार आहेत. वाहनतळासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, दसरा चौक, मादनाईक पंप, झेले चित्रमंदिर मागे, सिद्धेश्वर मंदिर परिसरात सोय केली आहे.
- संतोष डोके, सहायक पोलीस निरीक्षक, जयसिंगपूर

Web Title: Elgar today for 'FRP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.