शाळा सोडल्याचा दाखला देण्यातील संभ्रम दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:41+5:302021-07-23T04:15:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दहावीची परीक्षा झाली नसल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कोणती तारीख आणि शेरा नोंद करायचा, याबाबत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दहावीची परीक्षा झाली नसल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कोणती तारीख आणि शेरा नोंद करायचा, याबाबत कोल्हापुरातील माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून मार्गदर्शक सूचना केल्याने हा संभ्रम दूर झाला असून, मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यात दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. त्यानंतर अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निकमधील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आदी कागदपत्रे मिळविण्याची पालक, विद्यार्थ्यांकडून प्रक्रिया सुरू झाली. मात्र, दहावीची अंतिम लेखी परीक्षा झाली नसल्याने शाळा सोडल्याचा दाखल्यावर कोणती तारीख, शेरा नोंदविण्याबाबतची अडचण मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाली. शासनाकडूनही त्याबाबत कोणत्याही सूचना नव्हत्या. ते लक्षात घेऊन राज्य मुख्याध्यापक महामंडळाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तारीख, शेरा नोंदविण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा मुख्याध्यापक संघाने मुख्याध्यापकांना गेल्या चार दिवसांपूर्वी दिल्या आहेत. त्यानुसार मुख्याध्यापकांकडून कार्यवाही सुरू आहे.
पॉईंटर
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा : १०५४
दहावीतील एकूण विद्यार्थी : ५५१४३
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : ५५०८८
मुले : ३०३३७
मुली : २४७५१
मुख्याध्यापक काय म्हणतात?
दि. ३१ मे २०२१ अशी शाळा सोडल्याची तारीख, पुढील वर्ग नसल्याने असा शेरा नोंद करून विद्यार्थ्यांना दाखला देण्यात येत आहे.
- व्ही. बी. ठाकूर, माध्यमिक विद्यालय, कळंबा-पाचगाव
मागणीनुसार दाखला दिला, पुढील वर्ग नसल्याने अशी कारणांची नोंद करून शाळा सोडल्याच्या दाखल्याचे वितरण केले जात आहे.
- एम. एस. गोरे, प्रायव्हेट हायस्कूल
पालक म्हणतात
माझी मुलगी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दहावी उत्तीर्ण झाली. पुढील शिक्षणासाठी तिचा तेथील ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला जाणार आहे. त्यामुळे दाखला घ्यावा लागणार नाही.
-प्रवीण कुंभोजकर, शास्त्रीनगर
माझा मुलगा दहावी उत्तीर्ण झाला आहे. अजून त्याच्या पुढील प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी केलेली नाही. शाळेतून दाखला मिळविण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
- प्रसाद कुलकर्णी, शिवाजी पेठ
चौकट
एकच शेऱ्याबाबत सूचना
शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांसमवेत मुख्याध्यापक महामंडळाच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनुसार प्रत्यक्ष निकाल पत्रक वेगळे असणार आहे. त्यामुळे शाळांना दाखल्यावर एकसारखा शेरा, तारीख नोंदविण्याबाबत मुख्याध्यापकांना मार्गदर्शक सूचना केली असल्याचे कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी सांगितले.
पॉईंटर
शाळा सोडल्याचा दाखल्यातील नोंदी
शाळा सोडल्याचे कारण : मागणीनुसार दाखला दिला, पुढील वर्ग नसल्याने, शिक्षणासाठी अन्यत्र गेला यापैकी एक
शेरा : शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये एस. एस. सी. (इयत्ता दहावी) परीक्षा उत्तीर्ण.
शाळा सोडल्याची तारीख : दि. ३१ मे २०२१