मुलींच्या शिक्षणासाठी ‘इलिशा’चे अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 08:41 PM2018-10-11T20:41:55+5:302018-10-11T20:43:08+5:30
- संतोष मिठारी, कोल्हापूर.
/>
मुलींचे शिक्षण आणि सुरक्षेबाबत प्रबोधन, जनजागृतीचे काम कोल्हापुरातील इलिशा मिलिंद धोंड ही युवती करत आहे. सामाजिक भान जपत तिने लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सुखवस्तू कुटुंबातील इलिशा हिचे शालेय शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. शिक्षण घेताना तिच्या लक्षात आले की, केवळ घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने काही मुली या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ही गोष्ट तिने आपल्या वडिलांना सांगितली. त्यांच्या पाठबळावर तिने आपल्या शालेय जीवनापासून मुलींच्या शिक्षणाबाबत जागरुकता निर्माण करण्याचे पहिले पाऊल टाकले.
शाळांमध्ये जाऊन ती इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व सांगू लागली. मुलींच्या घरी जाऊन पालकांचे ती प्रबोधन करू लागली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा विचार तिच्या मनात आला. तिने हा विचार आपले वडील आणि मित्र-मैत्रिणींसमोर मांडला. त्यातून गेल्या सहा वर्षांपूर्वी एनजीओ कम्पॅशन २४ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ५० मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे पाऊल पडले. आज ही संख्या अडीच हजारांवर पोहोचली आहे. आजपर्यंत सुमारे दीड लाख मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शिक्षणाबाबतची जागरुकता निर्माण करण्यामध्ये ती यशस्वी ठरली. तिने सन २०१४ मध्ये ‘बेटी पढाओ’ या विषयावर ‘कम्पॅशन २४’ हा लघुपट तयार केला. स्वत:चे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयातून तिने या लघुपटाची निर्मिती केली. हा लघुपट आतापर्यंत एक कोटींहून अधिकजणांनी पाहिला आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘संवाद’ हा आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वातील या महत्त्वाच्या घटकाला अधिक विकसित करण्यासाठी पुण्यातील सिम्बॉयसिस संस्थेमध्ये मीडिया अॅण्ड कम्युनिकेशनचे सध्या ती शिक्षण घेत आहे. सामाजिक विषयांसह तरुणाईसाठीच्या विविध विषयांवरही ती लेखन करते. तिला प्रॉमिसिंग ब्लॉगरमधून गौरविण्यात आले आहे. फॅशन अँड फूड ब्लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये सर्वांत कमी वयाची, अत्यंत वेधक लेखन करणारी लेखिका, अशी तिची ओळख आहे.
मुलींवर होणारा अत्याचार आणि शोषणाविरोधात जागृती आणि प्रबोधनाचे काम तिने ‘विद्यार्थिनी सुरक्षा’ या मोहिमेंतर्गत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू केले आहे. पुण्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांत जाऊन मार्शल आर्टस्, स्वरक्षण आदींबाबत ती आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत मार्गदर्शन करीत आहे. शिक्षणाबरोबरच मुलींची सुरक्षितताही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यासाठी ती करीत असलेल्या कामाची व्याप्ती वाढावी, अशी तिची इच्छा आहे. एनजीओ कम्पॅशन २४ आणि वुई केअर या संस्थेमार्फत अडीच हजार मुलींना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यात आले आहे. या संस्थेची संचालिका म्हणून इलिशा कार्यरत आहे.
देशभरात घडलेल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने मी व्यथित झाले आहे. यावर मी विद्यार्थीनी सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. मुलींनी सुरक्षित, तर व्हावेच पण, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा स्वतंत्रपणे उमटावा; त्यासाठी आयुष्यभर काम करणार आहे. प्रत्येक मुलीने सामाजिक कार्यात योगदान द्यावे.
- ईलिशा धोंड