अभिजात संगीताचे मंदिर ‘देवल क्लब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:33 AM2019-01-21T00:33:18+5:302019-01-21T00:33:23+5:30
इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरला कलानगरी ही बिरूदावली देण्यात मोलाचे योगदान दिलेली कलासंस्था म्हणजे गायन ...
इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरला कलानगरी ही बिरूदावली देण्यात मोलाचे योगदान दिलेली कलासंस्था म्हणजे गायन समाज देवल क्लब. अभिजात संगीत, गायन, नाट्य, नृत्य अशा कलांचे मंदिर असलेल्या या संस्थेद्वारे अखंड प्रवाहित राहिलेल्या परंपरेला यंदा १३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. नव्या पिढीकडे या कलेचा वारसा सुपूर्द करण्यासाठी कलासंकुलाच्या उभारणीसाठी संस्थेचे अव्याहत प्रयत्न सुरू आहेत.
देवल क्लब हे अंबाबाईच्या देवळासारखं आहे. येथे सूर आणि लयीची आराधना अखंड सुरू असून, कलेवर प्रेम करणाऱ्यांसाठी इथली दारं कायम उघडी आहेत, हे शब्द आहेत लेखक पु. ल. देशपांडे यांचे. एकेकाळी भारतीय संगीतात मानाचे पान असलेल्या देवल क्लबमध्ये आपले गायन वादन व्हावे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न होते. त्यात भर पडली ती नाट्य कलेची. १९१३ साली संस्थेने नाट्यक्षेत्रात पाऊल ठेवले. विनोद, संगीत एकच प्याला, संगीत मानापमान, संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा ते अगदी पुरुषोत्तम करंडक, राज्य नाट्य स्पर्धेतील यशस्वी सहभागीतेपर्यंतचा हा प्रवास आहे. आजही संस्थेचे हे नावलौकिक अबाधित राहिले आहे.
संस्थेत शास्त्रीय गायन, हार्मोनियम, व्हायोलीन, सतार, तबला वादन आणि कथ्थकचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले असून, सध्या ३५० विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. गांधर्व महाविद्यालयाची परीक्षा येथे होते. कार्यक्रम समितीद्वारे वर्षभर मान्यवर तसेच उदयोन्मुख कलाकारांचे कार्यक्रम केले जातात. संस्थेचे सध्या कलासंकुलाचे काम सुरू असून, ते लवकरात लवकर पूर्णत्वास आणण्याचा मानस आहे. येथे एज्युकेशन ते परफॉर्मन्स पर्यंतचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
विद्यमान कार्यकारिणी
अध्यक्ष : व्ही. बी. पाटील, उपाध्यक्ष : चारूदत्त जोशी, कार्यवाह : सचिन पुरोहित, कोषाध्यक्ष : राजेंद्र पित्रे, कार्यक्रम समिती प्रमुख : श्रीकांत डिग्रजकर, संचालक : सुबोध गद्रे, उमा नाम जोशी, नितीन मुनीश्वर, किरण ज. पाटील, दिलीप चिटणीस, दिलीप गुणे, रामचंद्र टोपकर, अजित कुलकर्णी, अरुण डोंगरे, डॉ. आशुतोष देशपांडे.
म्युझिक आर्काईव्हज
संस्थेकडे जयपूर घराण्याचे तसेच विविध दिग्गज कलावंतांचे जवळपास १३०० ते १४०० जुने रेकॉर्डिंग तर ७०० ते ८०० ग्रामोफोन रेकॉर्ड उपलब्ध आहे. या सगळ्या रेकॉर्डिंगच्या डिजिटायझेशनचे काम सध्या सुरू असून, हा ठेवा संस्थेच्या कलासंकुलात म्युझिक आर्काईव्हजच्या माध्यमातून जतन व संवर्धन करण्यात येणार आहे.
शाहू महाराजांचा राजाश्रय
गोविंदराव म्हणजे बाबा देवल आणि त्यांच्या सहकाºयांनी १८८३ साली करवीर गायन समाजची स्थापना केली. येथे कलाकारांना बिदागी देऊन कार्यक्रम केले जायचे. पुढे १८९३ साली बाबा देवल, विसूभाऊ गोखले, त्र्यंबकराव दातार यांनी एकत्र येऊन गाण्यांचे कार्यक्रम सुरू केले. तो संगीत रंगभूमीचा काळ होता, त्यामुळे गायकनट नाटकाच्या सादरीकरणानंतर येथे हजेरी लावत. बाबा देवल यांच्या या खोलीला देवल क्लब अशी ओळख मिळाली. करवीर गायन समाज आणि देवल क्लब या दोन नामोल्लेखातून गायन समाज देवल क्लब ही संस्था आकाराला आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राज्यकारभार हाती घेतला आणि संगीतातले गौरीशंकर उस्ताद अल्लादिया खाँ यांना कोल्हापुरात आणले. दुसरीकडे देवल क्लबसाठी जागा आणि सहा हजार रुपयांची देणगीही दिली. तर अल्लादिया खाँ हे देवल क्लबच्या घटना समितीचे सदस्य होते. या राजाश्रयातून १९१९ साली जुन्या देवल क्लबची इमारत उभी राहिली; पण १९४६ साली ताराबाई राणीसाहेब यांनी दूरदृष्टीने विचार करत सध्याच्या नवीन इमारतीची जागा संस्थेला देऊ केली.