हेदवडे-गिरगाव पुलाच्या चारी बाजूचा भराव खचू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:26 AM2021-04-28T04:26:27+5:302021-04-28T04:26:27+5:30
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील हेदवडे-गिरगावदरम्यानच्या पुलाचा भराव खचल्याने सुमारे एक कोटी ६६ लाखांचा निधी पाण्यात खचून जाण्याचा धोका ...
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील हेदवडे-गिरगावदरम्यानच्या पुलाचा भराव खचल्याने सुमारे एक कोटी ६६ लाखांचा निधी पाण्यात खचून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव खचल्यामुळे वाहतुकीस प्रचंड धोका निर्माण झाला आहे. कांही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या व उद्घाटनापूर्वीच पुलाशेजारील भराव खचल्याने पुलाच्या कामाबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.
भराव मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठेकेदाराच्या हेकेखोर व अरेरावीमुळे परिसरातील सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मोरओहोळवरील हेदवडे-गिरगावदरम्यान जुना पूल होता. तो लहान असल्याने वाहतुकीस धोकादायक होता. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत होती. या ठिकाणी नवीन पूल व्हावा, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी होती. या मागणीचा विचार करून तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने या पुलास 'नाबार्ड' मधून १ कोटी ६६ लाखाचा निधी मंजूर झाला. कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन पूल उभारला. पण पुलाशेजारील दोन्ही बाजूस दहा फुटांचा भराव खचू लागला आहे. ठेकेदाराने भरावाचे काम निकृष्ट केल्यामुळे भरावा पहिल्याच वळीव पावसात २५ ते ३० फूट लांब खचून चारी बाजूस भराव निखळू लागला आहे. डांबरीकरण केलेल्या पुलाच्या चारी बाजूच्या भरावाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. खचलेल्या भेगा दिसू नयेत म्हणून, लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी ठेकेदाराने रस्त्यात खडी ओतली आहे. भराव खचल्याने हेदवडे-गिरगाव खोरीला होणार्या वाहतुकीला प्रचंड धोका निर्माण झाला आहे.
फोटो
हेदवडे येथील पुलाशेजारील भराव खचल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे.