पाटबंधारे कर्मचाऱ्यांना कोंडले
By admin | Published: November 16, 2016 12:41 AM2016-11-16T00:41:00+5:302016-11-16T00:41:00+5:30
निढोरीतील घटना : कालव्याला पाणीच नाही; शेतकऱ्यांचा उद्रेक
म्हाकवे : पाण्याच्या बाबतीत नेहमीच हेटाळणी करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत म्हाकवे, बानगे, आणूरसह सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये संताप खदखदत होता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आम्हाला पाणी का मिळत नाही? केवळ पाणीपट्टीच वसुली करीत राहणार काय? असे प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी काही संतप्त शेतकऱ्यांनी निढोरी कार्यालयाला टाळे लावून सर्वच कर्मचाऱ्यांना काही काळ कोंडले. येथील शेतकरी कालव्यातून पाणी मिळत नसल्याबाबत वारंवार टाहो फोडत असतानाही प्रशासन याकडे कानाडोळा का करते, हा मुद्दाच अनुत्तरित आहे.
काळम्मावाडी धरणाच्या निढोरी कालव्यातून म्हाकवेकडील कालव्यात बुधवारी (दि. ९) सकाळी पाणी सोडले आहे. मात्र, हे पाणी सात दिवसांनंतरही बानगेपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे १२ दिवसांच्या आवर्तनामध्ये बानगे, आणूर, म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याच्या आशा मावळत असल्यानेच शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळेच त्यांनी निढोरी कार्यालयावर मोर्चा काढून उद्रेकाला वाट करून दिली.
या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, रामचंद्र चौगुले, आदींनी केले.
यावेळी आंदोलनावेळी म्हाकवेचे उपसरपंच रमेश पाटील, विजय डाफळे, आप्पासाहेब पाटील, शहाजी पाटील, भगवान पाटील (बानगे), श्रीकांत कदम, कुंडलिक गमनिक, बाळासो मेथे (बानगे) यांसह आणूर, हदनाळ येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
‘लोकमत’चे आभार
म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांनाही निढोरी उजव्या कालव्याचे पाणी मिळावे यासाठी कच्च्या कालव्याची डागडुजी, सुरुवातीच्या गावांत उपसाबंदी, नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणे आवश्यक, आदी उपाययोजना सुचवत ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यामुळे येथील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना बळकटी मिळाल्याच्या प्रतिक्रियाही शेतकऱ्यांनी व्यक्त करून आभार मानले.
१२ दिवसांच्या आवर्तनामध्ये बानगे, आणूर, म्हाकवेसह सीमाभागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याच्या आशा मावळल्या
सात दिवसांनंतरही पाणी बानगेपर्यंंत पोहोचले नसल्याने उद्रेक