भ्रूणहत्या रॅकेटने हादरलेय म्हैसाळ

By admin | Published: March 6, 2017 11:53 PM2017-03-06T23:53:14+5:302017-03-06T23:53:14+5:30

रुग्णालयातील कागदपत्रे हस्तगत :

Embryo racket shook hands | भ्रूणहत्या रॅकेटने हादरलेय म्हैसाळ

भ्रूणहत्या रॅकेटने हादरलेय म्हैसाळ

Next



डॉक्टरच्या साथीदारांची चौकशी
डॉक्टरच्या कृत्याबाबत सर्वत्र संताप;
आरोग्य विभागाची चौकशी समिती
आज ‘म्हैसाळ बंद’ची हाक;
सामाजिक संघटनांकडून निषेध
सदानंद औंधे ल्ल मिरज
भ्रूणहत्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर मिरज तालुक्यातील म्हैसाळ गाव हादरून गेले आहे. येथे भ्रूणहत्येचा कत्तलखाना चालविणाऱ्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्याविरुध्द पोलिसांच्या कारवाईनंतर सोमवारी जिल्हा आरोग्य विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली. डॉ. खिद्रापुरे अद्याप फरार असून त्याच्या दोन साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलिसांनी आणखी कागदपत्रे जप्त केली.
मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा अनैसर्गिक गर्भपात करताना तिचा मृत्यू झाल्यानंतर, डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याचा कत्तलखाना उघडकीस आला आहे. डॉ. खिद्रापुरे याने रुग्णालयानजीकच पुरलेले १९ भ्रूण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी राम हंकारे, अन्न व औषध प्रशासनाचे सहनिरीक्षक स. मा. साखरेकर, सहाय्यक नियंत्रक सु. मा. सावंत यांच्या पथकाने रूग्णालयाची तपासणी केली. रूग्णालयात तळघरात व पहिल्या मजल्यावर दोन सुसज्ज शस्त्रक्रियागृहे, क्ष-किरण यंत्र, गर्भपातासाठी वापरण्यात येणारी औषधे, इंजेक्शन्स, भूल देण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा, तसेच तळघरात हौदही आढळला. रूग्णालयातील कागदपत्रे व संगणक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय सावंत, बेळंकीचे वैद्यकीय अधिकारी विजय जाधव, स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. अशोक शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी या पाचजणांची चौकशी समिती, डॉ. खिद्रापुरे याने केलेल्या अवैध गर्भपातांची चौकशी करणार आहे. त्याने होमिओपॅथी पदवी असतानाही अ‍ॅलोपॅथी उपचार केल्याचे व तळघरातील शस्त्रक्रियागृहात प्रसुती शस्त्रक्रिया, ओपीडी यासह मोठ्या शस्त्रक्रिया केल्याचा संशय आहे.
विनानोंदणी व्यवसायाबद्दल आरोग्य विभागाने त्याला नोटीस बजावून रूग्णालयातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. डॉ. खिद्रापुरे याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले. स्वाती जमदाडे या महिलेचा मृत्यू गर्भपातामुळे झाला काय, याचीही चौकशी करण्यात येत असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रूग्णालयात येऊन, रूग्णांवर उपचार करणाऱ्या अन्य डॉक्टरांना व डॉ. खिद्रापुरे याने गर्भपात केलेल्या रूग्णांना चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कनवाड (ता. शिरोळ) येथील बाबासाहेब खिद्रापुरे याने १५ वर्षापूर्वी म्हैसाळमध्ये सुतार गल्लीत एका दुकानगाळ्यात रुग्णालय थाटले. किरकोळ आजारावर औषधोपचार करीत त्याने तेथे शस्त्रक्रियाही सुरू केल्या. दहा वर्षापूर्वी त्याने शांतिसागर रस्त्यावर रुग्णालयाची इमारत बांधून त्यात महिलांची प्रसुती व गर्भपातासाठी शस्त्रक्रियागृह उभारले होते. भ्रूणहत्येच्या व्यवसायात त्याने चांगलाच जम बसविल्याने जिल्ह्यातील व कर्नाटकातील मोठ्या संख्येने रूग्ण गर्भपातासाठी त्याच्याकडे येत होते. तो यासाठी कमिशन देऊन एजंटांचीही मदत घेत होता.
रात्रीस खेळ चाले...
डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयात सुसज्ज शस्त्रक्रियागृह आढळले असून, रात्रीच्या वेळी तेथे गर्भपाताचा उद्योग चालत होता. दिवसा तातडीच्या गर्भपातासाठी तळघरात आणखी एक शस्त्रक्रियागृह तयार करण्यात आले होते. तळघरातील शस्त्रक्रियागृहात एक हौद आहे. या हौदात अ‍ॅसिड टाकून भ्रूण नष्ट करण्यात येत असल्याचा संशय आहे. रुग्णालयात गर्भपाताची उपकरणे व मोठ्याप्रमाणावर औषधे सापडली आहेत. गर्भपातासाठी २५ ते ३० हजार रूपये दर होता. गर्भपात केल्यानंतर गर्भाची प्लॅस्टिक पिशवीतून विल्हेवाट लावण्याचे काम रवींद्र सुतार हा करीत होता. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी भ्रूणांचे अवशेष जप्त केले. खिद्रापुरे याच्या रूग्णालयामागे काही औषधे जाळून टाकण्यात आल्याचे दिसून आले. रुग्णालयामध्ये सोमवारी आणखी काही भ्रूण सापडल्याच्या चर्चेमुळे रूग्णालयासमोर गर्दी झाली होती.
विनापरवाना, विनानोंदणी व्यवसाय
डॉ. खिद्रापुरे विनापरवाना, विनानोंदणी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरूध्द बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्ट, वैद्यकीय गर्भपात कायदा, मेडिकल प्रॅक्टिशनर अ‍ॅक्ट, ड्रग अ‍ॅन्ड कॉस्मेटिक अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्याने पुरलेल्या स्त्री भ्रूणांच्या अवशेषांच्या डीएनए तपासणीत भ्रूण स्त्री जातीचे असल्याचे निष्पन्न झाल्यास, लिंगनिदान कायद्याच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. या रॅकेटमध्ये गर्भपातासोबत लिंगनिदानाचीही सोय होती. कर्नाटकात ठराविक डॉक्टरांकडे गर्भाचे लिंगनिदान करून म्हैसाळमध्ये गर्भपाताचा हा उद्योग सुरू असल्याचा संशय असल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
वर्षा देशपांडे यांच्याकडून निषेध
सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी सोमवारी म्हैसाळ येथे भेट देऊन डॉ. खिद्रापुरे याच्या कृत्याचा निषेध केला. देशपांडे यांनी रूग्णालयाजवळ कचऱ्यात टाकलेल्या औषधांची पाहणी केली, तसेच फरारी डॉक्टर सापडत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. येत्या २४ तासात आरोपी डॉक्टर सापडलाच पाहिजे, असे त्यांनी पोलिसांना सुनावले. म्हैसाळमधील घटनेची सखोल चौकशी होऊन, ज्या ठिकाणी मुलींचा जन्मदर कमी आहे, त्या सर्व ठिकाणी प्रशासनाने कोम्बिंग आॅपरेशन करून अशा कृत्याचा शोध घ्यावा. लोकप्रतिनिधींनीही विधानसभेत आवाज उठवून म्हैसाळ प्रकरणाची चर्चा करावी, अशी मागणी अ‍ॅड. देशपांडे यांनी केली.
ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया...
भ्रूणहत्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर मिरज तालुक्यातील म्हैसाळ गाव हादरून गेले आहे. पंधरा वर्षापूर्वी म्हैसाळात येऊन गावात बस्तान बसविणाऱ्या डॉ. खिद्रापुरे याच्या कारनाम्यामुळे ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच्या कारनाम्याबद्दल नागरिकांनी यापूर्वी तक्रारी केल्या होत्या. तरीही त्याचा कत्तलखाना सुरूच राहिल्याचे गावातील शिवसेना कार्यकर्ते अनिल हुळ्ळे, भाजपचे नाना कांबळे यांनी सांगितले. चार वर्षापूर्वी गावात आलेल्या जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. डॉ. खिद्रापुरे याने एका महिलेची प्रसुती शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या पोटात कापूस राहिल्याने इन्फेक्शन होऊन तिचा मृत्यू झाला. मात्र हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार गेल्यानंतर, गतवर्षी मे महिन्यात रूग्णालयावर छापा टाकून तपासणी करण्यात आली. मात्र छाप्यात आक्षेपार्ह काही आढळले नसल्याचे सांगत, आरोग्य विभागाच्या पथकाने त्याला क्लीन चिट दिली होती. या अवैध व्यवसायातून मिळालेली संपत्ती व राजकीय पाठबळाच्या जोरावर त्याने अनेक तक्रारी मिटविल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्याची पत्नी होमिओपॅथी डॉक्टर असून, पतीच्या गैरहजेरीत तीसुध्दा गर्भपात करीत असल्याचे सांगण्यात आले. हे डॉक्टर दाम्पत्य अद्याप फरारी असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी केलेले कृत्य उघडकीस येणार आहे.

Web Title: Embryo racket shook hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.