उदगाव बनले अपघातांचा ‘हॉट स्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:42+5:302021-04-07T04:23:42+5:30
उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील नेहमी रहदारी असणारे गाव म्हणून उदगाव ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक असणाऱ्या या गावामध्ये ...
उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील नेहमी रहदारी असणारे गाव म्हणून उदगाव ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक असणाऱ्या या गावामध्ये गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. यामध्ये कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहनचालकांचा बेशिस्तपणा, रस्ते सुधारणा करण्यात असलेल्या अडचणी, स्थानिक प्रश्न हे कळीचे मुद्दे आहेत. परंतु वारंवार घडणाऱ्या अपघाताने उदगाव हे गाव अपघातांचा हॉट स्पॉट ठरले आहे.
उदगाव येथे कोल्हापूरला जाण्यासाठी जयसिंगपूर मार्गे व जैनापूर बायपास मार्गे नेहमी रहदारी असते. ऊस वाहतूक, औद्योगिक वसाहतीची आवक-जावक ही प्रामुख्याने याच मार्गावरून होते. अवजड वाहनेही शिरोळ बायपास मार्गे नेण्यात यावीत असे स्पष्ट आदेश असताना देखील, वाहन चालकांच्या मनमानीमुळे वाहतूक कोंडीला प्रोत्साहन मिळत आहे. अशा प्रकारामुळे गेल्या महिन्याभरात तब्बल सात जणांनी आपला जीव गमावला आहे.
रेल्वे ब्रीज ते रिलायन्स पंप येथे अरुंद रस्त्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला, तर जैनापूर फाटा येथे ऊस वाहतूक वाहनांमुळे चार ते पाच छोटे-मोठे अपघात झाले आहेत. मोठ्या वाहनधारकांनी उदगाव मार्गे जयसिंगपूरला वाहतूक न करता बायपास मार्गे केली, तरच या अपघातांचे प्रमाण कमी होईल. शिवाय अरुंद रस्ते असल्याने अपघातप्रवण क्षेत्राची विशेष सुधारणा करणे गरजेचे असल्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.
--------------
कोट -
सांगली-कोल्हापूर महामार्गावर प्रवास करत असताना गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अपघातांची नोंद झालेली आहे. यामुळे उदगाव परिसरात शेतकरी व पादचारी हे भीतीग्रस्त बनले आहेत. यावर शासनाने तात्काळ मार्ग काढावा.
- कलिमुन नदाफ, सरपंच, उदगाव
फोटो - ०६०४२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ -
उदगाव (ता. शिरोळ) येथे अपघातानंतर अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.