अत्यवस्थ रुग्णांना सर्वप्रथम दाखल करून उपचार करावेत : मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:29 PM2020-08-03T17:29:38+5:302020-08-03T17:31:22+5:30
खासगी वैद्यकीय रूग्णालयांनी अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना त्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिले.
कोल्हापूर : खासगी वैद्यकीय रूग्णालयांनी अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना त्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री मुश्रीफ यांनी कोविड-१९ बाबत आढावा बैठक घेतली.
या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रमुख उपस्थित होते. खासगी रूग्णालयांमध्ये रूग्णांना बेड उपलब्ध करून देण्याबाबत अधिकारी नेमावेत. नागरिकांनी विशेषत: ग्रामीण भागात मास्क न वापरणाऱ्यांवर पोलीसांनी सतर्क राहून कारवाई करावी.
अत्यवस्थ रूग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील काही रूग्णालये अधिग्रहित करता येतील का याबाबत नियोजन करा. त्याचबरोबर अत्यवस्थ रूग्णांसाठी नवीन यंत्रांची माहिती घेऊन त्याच्या उपयुक्ततेबाबतही माहिती घ्यावी आणि ते मागविण्याबाबत नियोजन करावे. रूग्णांना वाचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू.
सीपीआरमध्ये क्षमता वाढविण्यासाठी तयारी करा. ग्रामीण भागातील कोविड केंद्रांवर मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास सीपीआरवर वाढणारा ताण कमी होईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, आदी उपस्थित होते.
ऑक्जिजन टँक बसविण्याची सूचना
प्रत्येक सीसीसीमध्ये एक्सरे काढून त्याबाबतचा अहवाल देण्यासाठी बाह्ययंत्रणा नेमण्यात येत आहे. नॉन ऑक्सिजन बेडसाठी जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा करण्यात येत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन टँक बसविण्याबाबतची सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी अधिष्ठाता यांना दिली.
लक्षणे दिसताच स्वॅब तपासून उपचार घ्यावेत
अद्यापही रूग्ण अंगावर काढत आहेत आणि अत्यवस्थ झाल्यानंतर उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे मृत्यू होत आहेत. रूग्णांनी लक्षणे दिसताच स्वॅब तपासणी करण्यासाठी पुढे यावे. तत्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.