कैद्यांसाठी आपत्कालीन कारागृह पुन्हा लवकरच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:23 AM2021-04-12T04:23:23+5:302021-04-12T04:23:23+5:30
कोल्हापूर : कोरोना विषाणूचा झपाट्याने होणारा वाढता प्रादुर्भाव विचारता घेता कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने गतवर्षीप्रमाणे आयटीआय वसतिगृहामध्ये पुन्हा ...
कोल्हापूर : कोरोना विषाणूचा झपाट्याने होणारा वाढता प्रादुर्भाव विचारता घेता कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने गतवर्षीप्रमाणे आयटीआय वसतिगृहामध्ये पुन्हा आपत्कालीन कारागृहवजा कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कारागृहातील कैद्यांच्या मुलाखती बंद करण्याचाही प्रशासनाने महत्त्वपूर्ण घेतला आहे. सध्या कळंबा कारागृहात सुमारे २२०० कैदी आहेत.
गेल्या वर्षी राज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्याची बाधा कळंबा कारागृहातील कैद्यांना होऊ नये यासाठी आयटीआय वसतिगृहामध्ये आपत्कालीन कारागृहवजा कोविड सेंटर सुरू केले होते. तेथे दाखल होणाऱ्या कैद्यावर प्रथम १४ दिवस औषधोपचार करून त्यांना क्वारंटाईन केले जात होते. पुढे कोरोनाचा संसर्ग ओसरल्याने हे आपत्कालीन कारागृह बंद केले होते; पण रविवारी बिंदू चौक उपकारागृहात सापडलेल्या ३१ कोरोनाबाधित कैद्यांचा विचार करता तसेच कोरोनाचा कळंबा कारागृहात होणारा शिरकाव रोखण्यासाठी पूर्वीप्रमाणे पुन्हा आयटीआय वसतिगृहात आपत्कालीन कारागृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त तसेच कोरोनाचा औषध पुरवठा करण्यात येणार आहे. या आपत्कालीन कारागृहास लवकरच मंजुरी मिळेल. त्यानंतर ते सुरू करण्यात येणार आहे. काही कैद्यांच्या पॅरोल रजेचेही प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले आहेत. त्यांना मंजुरी मिळताच त्यांनाही पॅरोल रजेवर पाठविण्यात येणार आहे.
कैदी व्हीसीद्वारे न्यायालयात हजर
न्यायालयीन प्रक्रियेसाठी कैद्यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यापेक्षा त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल. दरम्यान, कैदी व त्यांचे नातेवाईक यांच्या प्रत्यक्ष मुलाखती बंद करण्यात आल्या आहेत.
कोट...
कोरोनाचा कळंबा कारागृहात शिरकाव होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी आपत्कालीन कारागृह व प्रत्यक्ष मुलाखती रद्दचा निर्णय घेतला आहे.
- चंद्रमणी इंदूरकर, अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर