नामांकित मल्लांचे डोळे 'महाराष्ट्र केसरी'कडे, कुस्तीगीर परिषदेची येत्या शनिवारी कार्यकारिणी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 03:47 PM2022-11-16T15:47:34+5:302022-11-16T15:49:26+5:30

पु्न्हा सिकंदर, पृथ्वीराज, माऊली, विशाल यांचीच चर्चा

Eminent wrestlers attention on Maharashtra Kesari, Executive meeting of Kustigir Parishad coming Saturday | नामांकित मल्लांचे डोळे 'महाराष्ट्र केसरी'कडे, कुस्तीगीर परिषदेची येत्या शनिवारी कार्यकारिणी बैठक

संग्रहित फोटो

Next

कोल्हापूर : भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता अनियमित कामकाजामुळे रद्द केली होती. त्यावर उच्च न्यायालयात दाद मागत राज्य कुस्तीगीर परिषदेने महाराष्ट्र केसरीसह कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशन घेण्याची परवानगी मिळवली. मात्र, अद्यापही तारीख जाहीर न झाल्याने स्पर्धा गाजविण्याच्या उद्देशाने तयारीला लागलेल्या राज्यभरातील कुस्तीगीरांचे शनिवारी (दि. १९) ला परिषदेच्या होणाऱ्या कार्यकारिणी बैठकीकडे डोळे लागले आहेत.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कामकाजात अनियमितता आढळल्यामुळे भारतीय कुस्तीगीर महासंघाने मान्यता रद्द केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकात खासदार रामदास तडस यांची अध्यक्षपदी, तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून ऑलिम्पियन काका पवार यांची निवड झाली. त्यास हरकत घेत बाळासाहेब लांडगे सरचिटणीस असलेल्या मूळच्या कुस्तीगीर परिषदेने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल लागला असून, बाळासाहेब लांडगे यांच्या परिषदेस २०२२ ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यास परवानगी दिली आहे.

तत्पूर्वी काही महिन्यांपूर्वी पुणे येथे अधिवेशन घेण्याची तयारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले होते. त्यावर मूळच्या कुस्तीगीर परिषदेचा १९ नोव्हेंबरला राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्याचा प्रयत्न आहे. यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा व अधिवेशनाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडीमुळे स्पर्धेच्या तयारीला जीवाचे रान करणाऱ्या राज्यभरातील कुस्तीगीरांना स्पर्धेची तारीख कधी जाहीर होते आणि आपण स्पर्धेत सहभागी कधी होतो, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

पु्न्हा सिकंदर, पृथ्वीराज, माऊली, विशाल यांचीच चर्चा

सातारा येथे झालेल्या २०२१ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील (जालिंदर मुंडे आबा तालीम)ने विशाल बनकर (गंगावेस, मूळचा मुंबई उपनगर) चा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेत गंगावेसचाच सिकंदर शेख, महान भारत केसरी माऊली जमदाडे यांचा चुरशीच्या लढतीत पृथ्वीराजने पराभव केला होता. आता हेच चौघे पुन्हा जाेमाने २०२२ ची स्पर्धा गाजविण्यासाठी तयारीला लागले आहेत.

स्पर्धा अहमदनगरला होण्याची शक्यता

डिसेंबरच्या मध्यावर अहमदनगरला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अधिवेशन होण्याची शक्यता जाणकार कुस्तीगीरांकडून व्यक्त होत आहे.

कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक लवकरच घेऊन अधिवेशनाची तारीख जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे राज्यभरातील कुस्तीगीरांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे. - बाळासाहेब लांडगे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

Web Title: Eminent wrestlers attention on Maharashtra Kesari, Executive meeting of Kustigir Parishad coming Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.