बाप्पांना भावपूर्ण निरोप

By admin | Published: September 11, 2016 12:43 AM2016-09-11T00:43:33+5:302016-09-11T00:48:41+5:30

रिकामे झाले घर..गेला माझा लंबोदर : विसर्जन मार्गांवर जत्रेचे स्वरुप

The emotional message to the father | बाप्पांना भावपूर्ण निरोप

बाप्पांना भावपूर्ण निरोप

Next

कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ ‘गणेश गणेश मोरया...’चा अखंड गजर, चिरमुऱ्यांची उधळण करीत कोल्हापूरकरांनी शनिवारी घरगुती गणपती बाप्पांना निरोप दिला. गणरायाला निरोप दिल्यानंतर रिकामे झाले घर..गेला माझा लंबोदर अशा भावनिक प्रतिक्रियाही सोशल मीडियावर शेअर झाल्या. शहरातील जलाशयांकडे जाणाऱ्या प्रमुख विसर्जन मार्गांना जत्रेचे स्वरूप आले. पर्यावरणप्रेमी संस्था, महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत नागरिकांनी पंचगंगा नदी तसेच तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन न करता पर्यायी कुंडांत विसर्जन केले. विधायक गणेशोत्सव साजरा करून नागरिकांनी पर्यावरणपूरक उत्सवाच्या चळवळीला बळ दिले.
गेल्या पाच दिवसांपासून भक्तांच्या घरात चैतन्य निर्माण करणाऱ्या गणपती बाप्पांच्या पूजनाचा अखेरचा दिवस असल्याने देवाला मोदकाचा नैवेद्य दाखविण्यात आला. गौरी, गणपती, शंकरोबा या परिवार देवतांचे पूजन झाले. त्यानंतर महिलांनी गौरीचे दोरे घेणे, हळदी-कुंकूअसे कार्यक्रम केले.
पंचगंगा नदीघाटावर सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जनासाठीच्या गणेशमूर्तींचे आगमन होत होते. या ठिकाणी पंचगंगा घाट संवर्धन समितीने पाच नद्यांचे पवित्र पाणी असलेली सहा विसर्जन कुंडे ठेवली होती. दुपारी चारनंतर घराघरांत श्री गणेशाची अखेरची आरती होऊ लागली. गणेशमूर्तीसोबतच गौरी, शंकरोबाचे डहाळे, मुखवटे यांच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली. त्यानंतर गणेशमूर्ती हातांत घेतलेल्या भाविकांचे लोंढेच्या लोंढे नदीघाटावर येऊ लागले. मात्र, बहुसंख्य भाविकांकडून नदीपात्राऐवजी विसर्जन कुंडांत गणेशमूर्ती विसर्जित केल्या जात होत्या.
कळंबा तलावाच्या सांडव्यावर पाचगाव व कळंबा ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन कुंडांची व निर्माल्य संकलनाची सोय करण्यात आली. याशिवाय रंकाळा, राजाराम तलाव, राजाराम बंधारा, कोटीतीर्थ या जलाशयांच्या ठिकाणीही नागरिकांनी कुंडांतच गणेशमूर्ती विसर्जित करण्याला प्राधान्य दिले. शहरातील विविध कॉलनी, वसाहती, अपार्टमेंट्स या ठिकाणीही तरुण मंडळांनी स्वयंस्फूर्तीने गणेशमूर्तींचे काहिलींत विसर्जन केले.


पर्यावरणपूर्वक
विसर्जनास बळ
निर्माल्यदान, मूर्तिदानची चळवळ असो की मूर्ती काहिलीत विसर्जनाची पद्धत असो, हे सगळे सुरू झाले पहिल्यांदा कोल्हापुरात. ही चळवळ चांगली रुजली आहे. लोक त्यास प्रतिसाद देत असल्याचे दिलासादायक चित्र शनिवारी पुन्हा दिसले. यंदा काही हिंदुत्ववादी संघटनांनी टोकाची भूमिका घेत मूर्ती नदीतच सोडा, असे आवाहन केले होते; परंतु त्यास फारसा प्रतिसाद न देता कोल्हापूरकरांनी नदीवरील काहिलीत मूर्ती सोडल्याच, शिवाय यंदा असेही चांगले चित्र दिसले की, अनेक कॉलनी, वसाहतींमध्ये लोकांनी काहिलीची व्यवस्था करून तिथेच सामुदायिक विसर्जन सोहळा केला. लोकांमध्ये धर्मभावनेइतकीच पर्यावरण रक्षणाबद्दलही जागरूकता असल्याचे प्रत्यंतर त्यातून दिसून आले.


या संस्थांचे
योगदान मोलाचे
पंचगंगा घाट संवर्धन समिती, ज्योतिरादित्य डेव्हलपर्स, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, ‘अवनि’ व ‘एकटी’ संस्था, कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघ, कोरगावकर ट्रस्ट, झंवर ग्रुप (श्रीराम फौंड्री), डी. आर. कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर अर्थमूव्हर्स असोसिएशन, आर्किटेक्ट सुधीर राऊत, विद्याप्रबोधिनी, शिवाजी विद्यापीठाचा एन. एस. एस. व पर्यावरण विभाग यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते दीपक पोलादे, निसर्गमित्र संस्था, विज्ञान प्रबोधिनी, राजे संभाजीनगर तरुण मंडळ, व्हाईट आर्मी, जीवनज्योत याशिवाय विविध प्रभागांतील नगरसेवकांनीही पर्यावरणपूरक गणेश विसर्जन चळवळीत मोलाचे योगदान दिले.


महापौर, खासदार, जिल्हाधिकारी,
छत्रपती घराणे यांच्या मूर्र्तींचेही कुंडात विसर्जन
खासदार धनंजय महाडिक यांनीही पंचगंगा नदीघाटावर गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक कुंडात विसर्जन केले. सकाळी अकरा वाजता त्यांनी पंचगंगेच्या पात्रात मूर्ती प्रतीकात्मकरीत्या विसर्जित करून ती संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केली. छत्रपती घराण्याची जुना राजवाडा येथील श्रींची मूर्तीदेखील विसर्जन कुंडात विसर्जित केली. महापौर अश्विनी रामाणे यांनी कळंबा तलाव येथील कुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन केले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनीही राजाराम बंधारा येथे विसर्जन कुंडात आपली गणेशमूर्ती विसर्जित केली.

Web Title: The emotional message to the father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.