पेटलेल्या चितेबरोबरच भावनांचाही कल्लोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:21 AM2021-05-01T04:21:30+5:302021-05-01T04:21:30+5:30
कोल्हापूर : मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हा आमच्या नोकरीचाच भाग आहे. ‘रोजचं मढं त्याला कोण रडं’, अशी सवयीनं झालेली आमच्या ...
कोल्हापूर : मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हा आमच्या नोकरीचाच भाग आहे. ‘रोजचं मढं त्याला कोण रडं’, अशी सवयीनं झालेली आमच्या मनाची अवस्था आहे; परंतु गेले वर्षभर कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करतोय, मन फार व्याकुळ होऊन गेलंय. पेटलेल्या चितेबरोबरच मनातील भावनांचाही कल्लोळ माजलेला आहे. प्रत्येक मृतदेहाला अग्नी दिला की हात जोडून प्रार्थना करतोय...भगवंता आता हे सगळं थांबव बाबा... अशी वेळ पुन्हा माणसांवर आणू नकोस.
पंचगंगा स्मशानभूमीत कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करीत असलेल्या बाळासाहेब भोसले या महानगरपालिका कर्मचाऱ्याची ही आंतरिक विनंती परमेश्वर ऐकणार की नाही माहीत नाही, पण ज्याच्या घरातील व्यक्ती मृत्यू होतात, त्यांना जेवढ्या वेदना होतात तितक्याच वेदनांनी भोसलेसुद्धा व्याकुळ होतात. मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे क्रियाकर्म पार पाडत असताना एकीकडे मृताच्या नातेवाइकांना आधार देणं, त्यांना मदत करणे यांसह स्वत:च्या आतील भावनांनाही वाट करून देण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागत आहे.
कोविड साथीत मरण पावणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने स्मशानभूमीतील कामाचा ताणही प्रचंड आहे. तरीही न थकता, न दमता वीसहून अधिक कर्मचारी काम करीत आहेत. नेहमीच्या कामापेक्षा सध्याचं काम अधिक जोखमीचं, धोकादायक आहे. स्वत:च्या जीवाला जपण्यापासून सगळी प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. ज्या स्मशानभूमीत लोक जायला घाबरायला लागले आहेत तिथे हे कर्मचारी काम करत आहेत.
आम्ही मानवतेचे वारस..
प्रत्येक दिवशी रुग्णालयातून एका एका वाहनातून चार पाच मृतदेह आणले जातात. मृतदेहावर चिकटवलेल्या लेबलवर त्या व्यक्तीचे नाव असते. त्याप्रमाणे आधी नोंद केली जाते. नंतर मृतदेह खाली उतरुन घेतला जातो. जागा उपलब्धतेनुसार सरणावर किंवा गॅस दाहिनीत ठेवून अंत्यसंस्कार करतो. रक्तातील नातेवाईक कोणीच जवळ नसतो. आम्हीच त्यांचे नातेवाईक बनतो, रक्ताचे नसलो तरी मानवतेचे वारस आम्हीच असतो. जड अंत:करणाने अग्नी देतो. चिता शांत झाली की रक्षा विसर्जनसुद्धा आम्हीच करतो, असे तेथील कर्मचारी गहिवरलेल्या स्वरात सांगत होते.
मुखात पाणी नाही, की शेवटचं दर्शन
काही नातेवाईक लांबूनच आम्हाला सांगतात, जरा चेहरा आम्हाला दाखवा. गयावया करतात; पण मृतदेह रुग्णालयातूनच गुंडाळून दिलेला असल्याने आणि आम्हाला तो सोडायचा नाही, अशा स्पष्ट सूचना असल्याने आम्हीच त्यांना म्हणतो.. माफ करा.. आम्ही चेहरा दाखवू शकत नाही. एरव्ही अंत्यदर्शन घेणे, शेवटी सरणावर गेल्यावर मुखात पाणी घालण्याचा एक भावनिक विधी होतो, पण यावेळी ते शक्य नाही. शेवटचं दर्शन नाही, की मुखात पाणी नाही. नातेसंबंधाने हक्क असूनही अग्नी देण्याची साेय राहिली नाही. माणूस माणसाला परका झाला आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर भगवंताला विनंती करतोय.... भगवंता हे सारं थांबवं. इतका पण क्रूर वागवू नकोस!
-अख्ख गाव ध्यानस्थ बसलं -
लांजातील एका व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले. त्याचा मुलगा सांगत होता. माझे वडील खूप चांगले होते. गावासाठी, गावातील नागरिकांसाठी त्यांनी भरपूर केलं. कोरोनाने आजारी पडले बरे व्हावेत म्हणून अख्खं गाव आठ दिवस ध्यानस्थ बसले. पण आज त्यांचा चेहरा गावालाच काय कुणालाच पहायला मिळाला नाही. ही आठवण सांगताना चांगली माणसंसुध्दा या साथीने ओढून नेल्याची भावना कर्मचारी व्यक्त करतात..