चित्रपट महामंडळ डिजिटल करण्यावर भर- मेघराज राजेभोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 10:44 AM2019-12-14T10:44:04+5:302019-12-14T10:46:19+5:30
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने स्वतंत्र यू ट्यूब चॅनेल, फेसबुक, टिष्ट्वटर अशा डिजिटल माध्यमांत प्रवेश केला आहे. या माध्यमांतून मराठी चित्रपटांचे हक्क विकून देण्याचा तसेच दर्जेदार चित्रपट निर्मिती व मराठी चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने स्वतंत्र यू ट्यूब चॅनेल, फेसबुक, टिष्ट्वटर अशा डिजिटल माध्यमांत प्रवेश केला आहे. या माध्यमांतून मराठी चित्रपटांचे हक्क विकून देण्याचा तसेच दर्जेदार चित्रपट निर्मिती व मराठी चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.
चित्रपट महामंडळाची सभा उद्या, रविवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, महामंडळाने कोल्हापूर व पुणे येथील कार्यालयांसाठी जागा खरेदी केली असून, आता मुंबर्ई येथील कार्यालयासाठीही जागेची पाहणी सुरू आहे. निर्माते व तंत्रज्ञ यांच्यातील आर्थिक तक्रार निवारण्यासाठी हमीपत्र सुुरू केले असून, स्त्री-कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांनुसार विशाखा समितीची स्थापना केली आहे. तसेच संवाद समिती स्थापन करून निर्माते, तंत्रज्ञ व कलावंत यांच्यातील वाद सोडविले आहेत. शालिनी सिनेटोनची जागा वाचविण्यात महामंडळाला यश आले आहे.
ते म्हणाले, आगामी काळात जागतिक महोत्सवात मराठी चित्रपटांचा सहभाग वाढविणे, फिल्म बझारमध्ये त्यांचे प्रदर्शन, सभासदांसाठी पेन्शन व मेडिक्लेम विमा योजना राबविणे, वितरक मिळत नाहीत असे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी योजना आखणे, अनुदान योजनेतील गुणांकन पद्धती बदलून श्रेणी पद्धत चालू करणे, निर्मात्यांना अनुदान वेळेवर व एकरकमी मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे.
लघुपट, वेब सीरिज, म्युझिक अल्बम, चित्रपट, माहितीपट निर्मात्यांना महामंडळाच्या अधिपत्याखाली आणणे, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भरीव निधी तयार करणे, चित्रपट परवानगीसाठी शासनाने सुरू केलेली एक खिडकी योजना महाराष्ट्रभर सुरू करावी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच ‘म्हाडा’च्या घरांसाठी महामंडळाच्या राखीव कोट्याची मागणी करण्यात येणार आहे. साहित्य व नाट्य संमेलनाच्या धर्तीवर चित्रपट संमेलनाचे आयोजन करण्याचाही मानस आहे. परिषदेस धनाजी यमकर, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, अरुण चोपदार यांच्यासह सभासद उपस्थित होते.
तो वाद सभासदांमधील
काही दिवसांपूर्वी महामंडळासमोर मिलिंद अष्टेकर यांच्या निर्दोष मुक्ततेवरून झालेल्या पोस्टरबाजीबाबत विचारले असता ते म्हणाले, हा दोन सभासदांमधील वैयक्तिक वाद आहे. त्यात महामंडळाचे नाव यायला नको होते. महामंडळाच्या नियमात ते बसत नाही; त्यामुळे आम्ही त्यांना नोटिस पाठवली आहे. वाद तुमच्यातच मिटवून घ्या, असे त्यांना सांगितले आहे.