शिरोळ तालुका कोरोनामुक्तीसाठी तपासण्यांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:27+5:302021-07-07T04:30:27+5:30
संदीप बावचे जयसिंगपूर : शहराबरोबर ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या अजूनही वाढतच आहे. अॅंंटिजन व आरटीपीसीआर तपासण्यांवर प्रशासकीय ...
संदीप बावचे
जयसिंगपूर : शहराबरोबर ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या अजूनही वाढतच आहे. अॅंंटिजन व आरटीपीसीआर तपासण्यांवर प्रशासकीय पातळीवर भर दिला जात आहे. विविध उपाययोजना राबवूनही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अजूनही थांबलेला नाही. त्यामुळे आणखी तपासण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. तपासण्या वाढविण्यात आल्याने छुपे रुग्ण मिळून येत आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून शिरोळ तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. एप्रिल, मे महिन्यापेक्षा जून महिन्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या कमी होईल, असे प्रशासनाला वाटत असताना ग्रामीण भागात जवळपास सतराहून अधिक गावात रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. नांदणी, दानोळी, धरणगुत्ती, अब्दुललाट, कवठेगुलंद, शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड या ठिकाणीही रुग्ण वाढत आहेत.
जयसिंगपूर शहरात दररोज पंधरा ते वीस रुग्ण आढळून येत आहेत. तरीदेखील मला काय होतंय या भावनेतून अनेकजण विनामास्क फिरताना दिसून येतात. पोलीस व पालिका प्रशासनाच्या पथकाकडून दंडात्मक कारवाईदेखील सुरू आहे. जयसिंगपूर, कुरुंदवाड व शिरोळमध्ये स्वॅब तपासणी वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य यंत्रणेकडून शासकीय, निमशासकीय बँका, सहकारी संस्था, व्यापारी, फळ-भाजी विक्रेतेशिवाय कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची ॲंटिजन बरोबरच आरटीपीसीआर तपासणी करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आणखी तपासण्यांवर भर देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. आणखी तीन ते चार दिवस या तपासण्या केल्या जाणार आहेत.
चौकट : तिसरी लाट थोपवायची असेल तर शिस्त पाळा
सध्या कोरोनाची दुसरी लाट अजूनही थांबायला तयार नाही. त्यातच तिसऱ्या लाटेची भीती लागून राहिली आहे. बेशिस्त वर्तनामुळे कोरोनाची दुसरी लाट आली. तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर मास्क वापरा व इतर आवश्यक शिस्त पाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.