ऊर्जा रूपांतरणाबाबतच्या संशोधनावर भर हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:22 AM2021-02-13T04:22:46+5:302021-02-13T04:22:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पैलवानकीसाठी प्रसिध्द असलेल्या आणि ‘एक गाव एक गणपतीची’ परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासणाऱ्या अर्जुनवाडा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पैलवानकीसाठी प्रसिध्द असलेल्या आणि ‘एक गाव एक गणपतीची’ परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासणाऱ्या अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील ऊर्जा, पर्यावरण क्षेत्रातील शास्त्रज्ञ डॉ. हेमराज यादव यांना केंद्र सरकारच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने पाच वर्षांसाठी रामानुजन फेलोशिप जाहीर केली आहे. त्यांच्या विषयातील जगभरातील संशोधनाची स्थिती, संशोधनातील पुढील टप्पा, फेलोशीपचे स्वरूप, आदींबाबत त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.
प्रश्न : ऊर्जा, पर्यावरण, जैवचिकित्सा संशोधनाबाबत जगभरात काय सुरू आहे?
उत्तर : वाढती लोकसंख्या, कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे होत असलेला वातावरणातील बदल हा जगभरातील वैज्ञानिकांच्या चिंतेचा विषय आहे. जीवाश्म इंधनाचा वापर आणि पर्यावरण प्रदूषण कमी करणे. त्यासह ऊर्जेची, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची, औषधांची, आरोग्य सुविधा, आदींची गरज पूर्ण करण्यावर वैज्ञानिक आणि विविध उद्योग समूहांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यामुळे जगभरात ऊर्जा, पर्यावरण, आणि जैव तंत्रज्ञान या विषयात अधिक संशोधन सुरु आहे. पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्यासाठी सन २०३०पर्यंत घातक रसायने आणि हवा, पाणी, माती प्रदूषण आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांची संख्या कमी करणे हे संयुक्त राष्ट्रातील शाश्वत विकासाचे ध्येय असून, त्यानुसार जगभरात संशोधन, अभ्यास सुरू आहे.
प्रश्न : आपल्या देशात याबाबत स्थिती कशी आहे?
उत्तर : सध्या जगातील सर्वात मोठे सामाजिक व शैक्षणिक आव्हान नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या विकासाशी, स्वच्छ वातावरणाशी आणि जैव तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. हे आव्हान पेलण्यासाठी उत्कृष्ट संशोधकांची निर्मिती व संशोधन विकसित करण्याचे काम मी सध्या कार्यरत असलेल्या दक्षिण कोरियामध्ये सुरू आहे. आपल्या भारत देशाची ऊर्जेची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी आपल्याला ऊर्जा निर्मिती, साठवणूक, आणि रूपांतरण करणे यासाठी संशोधनावर भर देणे गरजेचे आहे. संशोधन आणि नवनिर्मितीच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये प्रगती होऊ शकते. बुध्दीमानांची गळती रोखण्यासाठी भारतामध्ये युवकांना प्रोत्साहन देण्याच्या उपाययोजना वाढवण्याची गरज आहे. उच्च पदवी, पदव्युत्तरसह पदवी स्तरावर संशोधनाचा वेग वाढवला पाहिजे.
प्रश्न : रामानुजन फेलोशिपच्या माध्यमातून आपण कोणत्या विषयावर संशोधन करणार आहात?
उत्तर : रामानुजन फेलोशिपच्या माध्यमातून नॅनो मटेरिअलपासून ऊर्जा रूपांतरण आणि साठवणुकीसाठी, विद्युत रासायनिक अपशोषण, हवा आणि पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी, जैव तंत्रज्ञानामध्ये नॅनोकणांचा उपयोग जीवाणू प्रतिबंधक, औषधोपचार करण्यासाठी करण्यात येईल. कार्बन डायऑक्साईड नियंत्रित करण्यासाठी आणि त्याच्यापासून उपयुक्त रसायने बनवण्यासाठी, पाण्याचे अपघटन करण्यासाठी संशोधन केले जाईल.
चौकट
ऊर्जा रूपांतरण म्हणजे काय?
ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित करणे म्हणजे ऊर्जा रूपांतरण आहे. त्यात रासायनिक ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेमध्ये, तर सौरऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करणे. सौरऊर्जेपासून रासायनिक अभिक्रिया, कृत्रिम प्रकाश संश्लेषण करणे आदींचा समावेश होतो. हे रूपांतरण प्रदूषण कमी करण्यास आणि पारंपरिक मार्गाने शक्य नसलेल्या रासायनिक अभिक्रिया करण्यासाठी मदत करते. अक्षय ऊर्जेच्या स्रोतांचा वापर वातावरणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन करत नाही. त्यामुळे पर्यावरण रक्षण होईल, असे डॉ. यादव यांनी सांगितले.
चौकट
रामानुजन फेलोशिपचे स्वरूप
बुध्दीमानांची गळती रोखण्यासाठी वैज्ञानिकांना रामानुजन फेलोशिपद्वारे आर्थिक मदत करण्यात येते. या शिष्यवृत्तीचा पुरस्कार जगभरातील हुशार भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना देण्यात येतो. ही फेलोशीप मर्यादित वैज्ञानिकांना दिली जाते. ही निवड संशोधन, प्रकाशने आणि अर्जदारांनी मांडलेल्या प्रस्तावाव्दारे केली जाते. या फेलोशिपचा कालावधी पाच वर्षांचा असल्याचे डॉ. यादव यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
कोरोनासारख्या संकटात इंटर डिसिप्लनरी (आंतरविद्याशाखीय) शिक्षण, संशोधनाची गरज लक्षात आली. विद्यार्थी, नवीन संशोधकांनी त्यादृष्टीने संशोधन करावे. त्यातून नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
- डॉ. हेमराज यादव
फोटो (१२०२२०२१-कोल-हेमराज यादव (फेलोशिप)