कृषी विद्यापीठाद्वारे महिला सक्षमीकरण मूल्यवर्धनावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:29 AM2021-09-04T04:29:00+5:302021-09-04T04:29:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व कौशल्ययुक्त शिक्षण तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व कौशल्ययुक्त शिक्षण तर मिळेलच, पण त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या कृषीविषयक सुविधांचे प्रमुख केंद्रही बनेल. कृषी उत्पादनाच्या मूल्यवर्धनाबरच शेतकरी विशेषतः महिला सक्षमीकरणावर आपला भर राहील, अशी माहिती डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी दिली.
भविष्यातील बाजारपेठेची गरज ओळखून अन्य विद्यापीठांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम व अभिनव अध्ययन पद्धती यांचा वापर या विद्यापीठात केला जाणार आहे. वेगाने विकसित होत असलेल्या फूड टेक्रोलॉजी व संगणक युगाचे भविष्य असलेल्या डेटा सायन्स व मशीन लर्निंगसारखे अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान न देता कल्पकता, संशोधन वृत्ती व रोजगाराभिमुखता यांचा विकास केला जाईल. विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याबरोबरच संशोधनात्मक व विकासात्मक कार्यावर भर दिला जाईल. जिल्ह्याच्या कृषी विकासाला गती देण्यासाठी हे विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या भागात तयार होणारे फळे आहे त्या स्थितीत विक्री करण्यापेक्षा त्याचे मूल्यवर्धन केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. यासाठी शेतकऱ्याची ‘फार्म प्रोड्युसर कंपनी’ स्थापन करण्यामध्ये विद्यापीठ मार्गदर्शकाची भूमिका निभावेल. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनाच्या माध्यमातून त्यासाठी निधी मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करू. शेतकऱ्याना संघटित करून, फूड प्रोसेसिंग, पॅकिंग, ग्रेडिंग अशा विविध सुविधा निर्माण करून उत्पादित मालाला देशात व परदेशातही बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नियोजन करता येईल.
महिलांना पाठबळ
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ व डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आसपासची गावे दत्तक घेऊन कृषी विकासावर भर दिला जाईल. महिलांच्या सबलीकरणावर भर देऊन ती कमावती होईल यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. त्यासाठी सेंद्रिय शेती, मशरूम उत्पादन यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याचबरोबर लोणची, जॅम, ज्यूस, आदी पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
‘केबीके’कडून विक्रीचीही व्यवस्था
महिलांनी तयार केलेली ही उत्पादने खरेदी करून त्यांच्या विक्रीसाठीही विद्यापीठ पुढाकार घेईल. त्यासाठी कृषी बिझनेस केंद्र (केबीके) सुरू करण्याची संकल्पना आहे. या माध्यमातून महिलांची उत्पादने, विद्यापीठ कॅम्पसमधील कृषी उत्पादने, त्याचबरोबर दुग्ध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये सुमारे पाच हजार नारळाची झाडे असून, त्याचे उत्पादन येत्या पाच वर्षांत दुप्पट होईल यासाठी संशोधनात्मक कार्य केले जाईल. त्यासाठी कृषी विज्ञानातील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. उत्तम प्रतीची नर्सरी तयार करण्याचाही मानस असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
नोकरी देणारे विद्यार्थी घडवू...
या विद्यापीठाने तयार केलेले मॉडेल देश पटलावर नावाजले जाईल असा आपला प्रयत्न राहणार आहे. आमच्या विद्यपीठात शिकणाऱ्या विद्यर्थ्याला अभ्यासक्रम व पूरक ज्ञान यामुळे वेगळी ओळख निर्माण करता येईल. येथील विद्यार्थी हा नोकरी शोधणारा नव्हे, तर इतरांना नोकरी देण्यासाठी सक्षम ठरेल असे शिक्षण डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे प्रा. डॉ. के. प्रथापन यांनी सांगितले.