मान्यताप्राप्त संघटनेमुळे कर्मचारी कर्जबाजारी

By Admin | Published: May 20, 2015 11:42 PM2015-05-20T23:42:13+5:302015-05-20T23:58:16+5:30

जयप्रकाश छाजेड : पगारवाढीच्या मागणीसाठी ‘इंटक’च्यावतीने जून महिन्यात ‘बेमुदत बंद’ची हाक

Employee Debtors due to a recognized organization | मान्यताप्राप्त संघटनेमुळे कर्मचारी कर्जबाजारी

मान्यताप्राप्त संघटनेमुळे कर्मचारी कर्जबाजारी

googlenewsNext

कोल्हापूर : महाराष्ट्र एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार हे मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या नाकर्तेपणामुळे इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी आहेत. मान्यताप्राप्त संघटनेच्या स्वार्थी भूमिकेमुळे अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. यासाठी एस.टी. कर्मचाऱ्यांना कर्जमुक्तीसाठी पगारवाढीची नितांत गरज आहे. पगारवाढीच्या मागणीसाठी ‘इंटक’च्या वतीने जून महिन्यात बेमुदत बंद पुकारण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्टेट ट्रान्स्पोर्ट को-आॅप. बँक लि.च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना शाहू स्मारक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. छाजेड म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील हजारो कोटी रुपये तोट्यात असलेल्या ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर औद्योगिक कलह कायदा १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार २०१२-२०१६ रद्द करून एस.टी. कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी. यासाठी पगारवाढीच्या पाठिंब्यासाठी व संपाबाबत राज्यभरातील एस.टी. कर्मचाऱ्यांंकडून मिस कॉलद्वारे मतदान घेणे सुरू आहे. चार दिवसांत हजारो जणांनी मिस कॉल देऊन पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जून महिन्यात बेमुदत संप पुकारला जाणार आहे.
एस. टी. बॅँकेने परराज्यांत व राज्यात गुंतविलेल्या रकमेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामध्ये गुंतवणुकीची खरेदी किंमत (बुक व्हॅल्यू) ३४५.६२ कोटी रुपये व दर्शनी किंमत (फेस व्हॅल्यू) ३४९.४४ कोटी रुपये आहे; परंतु आज त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत (मार्केट व्हॅल्यू) ३३५.०१ कोटी रुपये आहे. त्यामुळे गुंतवणुकीत १०.६१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे झाले आहे. सभासदांच्या श्रमाच्या असलेल्या ठेवींतील सुमारे १५६ कोटी रुपये केवळ पाच ते नऊ टक्क्यांपर्यंत व्याजदरात अन्य राज्यांमध्ये गुंतविले आहे. परंतु एस. टी. कर्मचाऱ्यांकडून मात्र कर्जावर १३ टक्के व्याज घेतले जाते. त्यामुळेच बँकेच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर पारदर्शी कारभार व भ्रष्टाचारमुक्त बँक करून, कर्मचाऱ्यांना कमी व्याजदर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.
यावेळी कार्याध्यक्ष मुकेश तिगोटे, उपाध्यक्ष बंडोपंत वाडकर, रावसाहेब माणकापुरे, डी. पी. बनसोडे, आनंदराव दोपारे, आप्पासाहेब साळोखे, सारिका शिंदे, श्रीकांत सड्डू, आदी उपस्थित होते.

Web Title: Employee Debtors due to a recognized organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.