कर्मचाऱ्यांच्या ५० जागा गोठवल्या

By admin | Published: September 21, 2015 12:22 AM2015-09-21T00:22:33+5:302015-09-21T00:34:01+5:30

बाजार समिती : आस्थापनाचा खर्च कमी करण्यासाठी ‘पणन’चे आदेश : नेत्यांसह संचालकांचे मनसुबे उधळले

Employee frozen 50 seats | कर्मचाऱ्यांच्या ५० जागा गोठवल्या

कर्मचाऱ्यांच्या ५० जागा गोठवल्या

Next

राजाराम लोंढे-कोल्हापूर --- शेती उत्पन्न बाजार समितीचा आस्थापना खर्च जास्त असल्याने स्टापिंग पॅटर्न करण्याचे आदेश पणन संचालकांनी दिले आहेत. स्टापिंग पॅटर्नमधील ५० जागा गोठवल्या असून, १४५ कर्मचाऱ्यांचाच आता स्टापिंग पॅटर्न राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर जम्बो नोकरभरती करण्याचा मानस घेऊन सत्तेवर आलेल्या नेत्यांसह संचालकांचे मनसुबे उधळले आहेत.
बाजार समितीचा सध्या १९५ कर्मचाऱ्यांचा स्टापिंग पॅटर्न आहे. त्यापैकी १३७ कर्मचारी विविध विभागांत कार्यरत आहेत. समितीच्या कर्मचाऱ्यांना निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा असल्याने त्यांना गलेलठ्ठ पगार आहेत. त्यामुळे बाजार समितीमधील नोकरी म्हणजे प्रतिष्ठेची बनल्याने अनेकांच्या नोकरीसाठी उड्या असतात. बाजार समितीचे उत्पन्न व कर्मचाऱ्यांवर होणारा पगार यांचा ताळमेळ बसत नाही. आस्थापनाचा खर्च हा ४७ टक्के आहे. पणन मंडळाच्या नियमानुसार हा खर्च जास्तीत जास्त ४५ टक्क्यांपर्यंत असणे गरजेचे आहे.
मागील संचालकांनी बाजार समितीत ४१ जणांची जम्बो नोकरभरती केली होती. संचालकांमध्ये वाटणीवरून वाद झाल्यानंतर चार कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. प्रत्यक्षात ३७ कर्मचारीच कामावर राहिले; पण याविरोधात नंदकुमार वळंजू यांनी न्यायालयात तक्रार केली. हे प्रकरण समितीमध्ये तब्बल दीड वर्षे गाजले. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी प्रोसीडिंग गायब होण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले होते. तोपर्यंत ‘पणन’ने कारभारावर ठपके ठेवत संचालक मंडळ बरखास्त केले, त्यानंतर प्रशासक आले आणि तेही दहा महिन्यांत गेले. शेवटच्या टप्प्यात अशासकीय मंडळ आले.
या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी नेत्यांचा अशासकीय मंडळावर दबाव होता. रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने पेच निर्माण झाला होता. कर्मचाऱ्यांना कायम करण्यावरून अशासकीय मंडळात मतमतांतर होते. वाद मिटेपर्यंत अशासकीय सदस्यच पायउतार झाले. त्यानंतर प्रशासक म्हणून आलेले रंजन लाखे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना रितसर कमी केले.
त्यानंतर बाजार समितीची निवडणूक झाली आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य मित्रपक्षांची सत्ता आली. सत्तेवर येताच कमी केलेल्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. तोपर्यंत पणन संचालकांनी बाजार समितीचे उत्पन्न व कर्मचाऱ्यांच्या पगारावरील खर्च याचा ताळमेळ पाहून ५० जागा गोठवण्याचे आदेश दिले. आता बाजार समितीचा स्टापिंग पॅटर्न १९५ ऐवजी १४५ झाला आहे. सध्या १३७ कर्मचारी कार्यरत असल्याने नव्याने नोकरभरती करण्यास संचालकांना संधी मिळणार नाही. त्यामुळे नेत्यांसह संचालकांचे नोकरभरतीचे मनसुबे उधळले आहेत.


अशी आहे कर्मचाऱ्यांची संख्या
उपसचिव - २
सहायक सचिव - ७
निरीक्षक - १२
वरिष्ठ लिपिक - २२
कनिष्ठ लिपिक - २५
शिपाई - १२
अभियंता - १

बांधकाम पर्यवेक्षक - १
वायरमन - १
सुरक्षा अधिकारी - १
उपसुरक्षा अधिकारी - १
वॉचमन - ४५
मजूर - ५
ड्रायव्हर - २

Web Title: Employee frozen 50 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.