कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांची ४ टक्के पगार वाढ, मागील फरकही मिळणार

By राजाराम लोंढे | Published: July 30, 2024 12:39 PM2024-07-30T12:39:06+5:302024-07-30T12:39:50+5:30

संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय 

Employees of Kolhapur District Bank will get 4 percent salary hike | कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांची ४ टक्के पगार वाढ, मागील फरकही मिळणार

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांची ४ टक्के पगार वाढ, मागील फरकही मिळणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना ४ टक्के पगारवाढीचा निर्णय अखेर सोमवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. युनियन व बँक व्यवस्थापनामध्ये याबाबत ५ ऑगस्टला करार केला जाणार असून १ एप्रिल २०१७ पासूनचा ३६ कोटी फरकही दिला जाणार आहे.

जिल्हा बँक कर्मचारी व बँक व्यवस्थापनामध्ये २००७ मध्ये पगारवाढीचा करार झाला होता. त्याची मुदत मार्च २०११ पर्यंत होती. मात्र, बँकेवर २००९ ला प्रशासकीय मंडळ आल्याने पुन्हा करारच होऊ शकला नाही. मे २०१५ मध्ये बँकेचे संचालक मंडळ कार्यरत झाले. मात्र, बँकेला संचित तोटा असल्याने पगारवाढीचा निर्णय झाला नाही. बँक २०१७ ला नफ्यात आल्यानंतर युनियनने पगारवाढीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यातून २००४ व २०१८ मध्ये कायम झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक-एक इन्क्रिमेंट, ५ टक्के पगारवाढ व मागील फरक आदी मागण्या युनियनच्या होत्या.

गेली वर्षभर बँक व्यवस्थापन व युनियनमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. यातून ४ टक्के पगार वाढ, ७ वर्षांचा फरक आदी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. फरकापोटी बँकेने मार्च २०२४ च्या ताळेबंदाला १५ कोटींची तरतूद करून ठेवली आहे; पण फरक एक रकमी देण्याची मागणी युनियनची आहे.

वर्षाला ३७ कोटींचा अतिरिक्त बोजा

पगार वाढीच्या निर्णयाने जिल्हा बँकेला वार्षिक ३७ कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मुळात बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे ताळेबंदावर फारसा ताण पडेल, अशी सध्या तरी स्थिती नाही.

सेवानिवृत्तांनाही महिन्याला १०० रुपये

एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१७ अखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी कोणत्याही पगारवाढ मिळाली नाही. त्यांच्यासाठी युनियनने महिन्याला २०० रुपयांची मागणी केली होती, संचालक मंडळाने १०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ७१ महिन्यांचे प्रत्येक ७१०० रुपये मिळणार आहेत.

असे झालेत निर्णय..

१ एप्रिल २०१७ पासून ४ टक्के पगारवाढ
७ वर्षांचा ३६ कोटी फरकही मिळणार
सेवानिवृत्तांना ७१ महिन्यांचे ७१०० रुपये मिळणार

Web Title: Employees of Kolhapur District Bank will get 4 percent salary hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.