कृपासिंधू डेव्हलपर्सच्या त्या लिपिकासह कर्मचाऱ्यांचे जबाब
By admin | Published: March 14, 2016 01:06 AM2016-03-14T01:06:44+5:302016-03-14T01:07:57+5:30
मृत्यूचा बनाव प्रकरण : अमोल पवार रमेश नाईकला घेऊन जाताना पाहणारे दहा साक्षीदार; आणखी काही साक्षीदारांचे जबाब आज नोंदविणार
कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याच्या मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंगशेजारील कृपासिंधू डेव्हलपर्सच्या कार्यालयातील ‘त्या’ लिपिकासह कर्मचाऱ्यांचे जबाब रविवारी पोलिसांनी घेतले. कार्यालयातील कागदपत्रेही यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतली. पवार बंधूंच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे व साक्षी, जबाब गोळा करता येतील त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. आजरा, गडहिंग्लज व कोल्हापूर अशा तीन स्तरांवर पोलिसांची तीन पथके तपास करत आहेत. अमोल पवार याला घटनेपूर्वी मृत रमेश नाईक याला घेऊन जाताना पाहिलेल्या दहा महत्त्वपूर्ण साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. काही साक्षीदारांचे आज, सोमवारी पोलिस मुख्यालयात दिवसभर जबाब घेतले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विम्याच्या ३५ कोटी रुपयांचा लाभ मिळविण्याच्या उद्देशाने स्वत:च्या मृत्यूचा बनाव करण्यासाठी सेंट्रिंग कामगार रमेश कृष्णाप्पा नाईक (रा. गडहिंग्लज, मूळ रा. विजापूर) याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अमोल जयवंत पवार व त्याचा भाऊ विनायक या दोघांना अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तीन पथके स्वतंत्रपणे या गुन्ह्यांवर तपास करत आहे. आतापर्यंत पोलिसांनी पवार बंधू, त्यांची पत्नी, नातेवाईक, मृत रमेश नाईक याचे आई-वडील, नातेवाइकांचे जबाब घेतले. अमोल व विनायक पवार यांना आजरा-आंबोली मार्गावरील हाळोली फाट्यानजीक फिरवून त्यांच्याकडून खून कसा केला त्याचे प्रात्यक्षिक घेतले. मृत रमेश नाईक याचे कपडे जाळले त्या ठिकाणाचा पंचनामा केला. आजरा कारखाना मार्गावर रात्रभर वर्दळ असते. या मार्गावरून अमोल पवार हा गेला होता. त्याला कोणी पाहिले आहे का, तसेच मृत रमेशला ज्या हॉटेलवर जेवण दिले, त्या हॉटेल व्यवस्थापक व कामगार अशा साक्षीदारांचा शोध घेत जबाब घेतले.
अमोल पवार याचे मंगळवार पेठेत कार्यालय आहे. त्याठिकाणी काम करणाऱ्या लिपिकासह अन्य कर्मचाऱ्यांचे लेखी जबाब रविवारी पोलिसांनी घेतले. यावेळी पवार याच्या कटातून बचावलेल्या ‘त्या’ लिपिकाचा भीतीने रक्तदाब वाढला आहे.
त्याच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली त्यावेळी त्याने अमोल पवार यांनी मला घटनेच्या आठ दिवसांपूर्वी लॉजवर नेऊन ठेवले होते. कर्जाच्या वसुलीसाठी लोक घरी व कार्यालयात येत आहेत.
मी घरी व कार्यालयात जात नसल्याने ते तुला त्रास देतील, त्यामुळे तू आठ दिवस लॉजवरच राहा, असे सांगून तुला जे हवे ते खायला घे, असेही सांगून गेले होते. नशीब चांगले म्हणूनच मी वाचलो, असे म्हणून लिपिकाने पोलिसांना हात जोडल्याचे सूत्रांनी सांगितले.
पवारच्या संपर्कात असलेल्या काही बांधकाम व्यावसायिकांचेही पोलिसांनी जबाब घेतले. तपासाची व्याप्ती मोठी असल्याने या
गुन्ह्यांच्या तपासाची माहिती पोलिसांकडून गोपनीय ठेवली जात असली, तरी याप्रकरणी जाणून घेण्याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
तपासावर पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील हे लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते व त्यांचे पथक काम करीत आहे.
‘त्या’ वजनदार नगरसेवकाची चर्चा
अमोल पवार याच्याकडे वसुलीचा तगादा लावलेला वजनदार नगरसेवक हा एका माजी मंत्र्यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे समजते. त्याच्यावर यापूर्वी एका शिक्षण संस्थेमध्ये नोकरभरतीप्रकरणी फसवणुकीचाही आरोप आहे.
त्याच्याच ग्रुपमधील एक कार्यकर्ता खासगी सावकारी करतो. त्यानेही पवार याला कर्ज पुरविले आहे. या दोघांनी गुंडांच्या मदतीने पवार याला वसुलीसाठी हैराण करून सोडले होते. अशी चर्चा महापालिका व पोलिस दलात आहे.
त्यांच्यासह आणखी एका नगरसेवकासह सावकारांना पोलिस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात हजर राहण्याचे फर्मान काढले आहे.