कर्मचारी संघाची कोल्हापूर महापालिका प्रशासकांना नोटीस; मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मध्यरात्रीपासून संपावर
By भारत चव्हाण | Published: October 16, 2023 08:36 PM2023-10-16T20:36:36+5:302023-10-16T20:37:10+5:30
महापालिकेत काम करणारे चतुर्थश्रेणीतील ८४ कायम कर्मचारी वर्ग ३ साठीच्या पदोन्नतीसाठी पात्र आहेत.
कोल्हापूर : महापालिकेच्या रोजंदारी तसेच कायम कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत दि.२९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जात असल्याची कायदेशीर नोटीस कर्मचारी संघाने सोमवारी प्रशासकांना लागू केली. गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करत असूनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याने कर्मचारी संघाने हे पाऊल उचलले आहे.
महापालिकेत काम करणारे चतुर्थश्रेणीतील ८४ कायम कर्मचारी वर्ग ३ साठीच्या पदोन्नतीसाठी पात्र आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार आहे, परंतु अंतिम मान्यता राहिली आहे. येत्या दिवाळीपूर्वी या पदोन्नती द्याव्यात, अशी संघाची मागणी आहे. दिवाळी सणासाठी कायम कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये तर रोजंदारी कर्मचाऱ्यांना ६००० रुपये तसलमात देण्याची मागणीही संघाने केली आहे.
वर्ग ४ मध्ये मुकादम, मुकादम कम क्लार्क यांना पदोन्नती देताना पदोन्नती समितीच्या मान्यतेची गरज नसताना या पदोन्नती रोखण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांचे कसूरी तसेच गैरहजेरीबाबतचे अहवाल मागवून पदोन्नती द्यावी, आश्वासित प्रगती योजनेचे लाभ पात्र कर्मचाऱ्यांना द्यावा, २००५ नंतर जे कर्मचारी कायम झाले आहेत, त्यांचे कायद्यानुसार नॅशनल पेन्शन स्कीम खाती सुरु करुन त्यावर फंडाची रक्कम फरकासह भरण्यात यावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर कायम नेमणुका द्याव्यात, महागाई भत्त्याच्या फरकाची चार टक्के रक्कम सहा महिने दिलेली नाही, ती तात्काळ द्यावी, अशा मागण्या नोटीसमध्ये करण्यात आल्या आहेत. ही नोटीस जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे व अजित तिवले यांनी दिली आहे.