खासगी एजन्सीकडून कर्मचारी घेणार : आठ दिवसांत कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 08:28 PM2020-01-02T20:28:48+5:302020-01-02T20:31:36+5:30
शहरातील प्रमुख मार्गांवरील फूटपाथवर उगवलेली झाडेझुडपे काढावीत, त्यांची स्वच्छता करण्यात यावी, शहरातील रस्त्यांची पॅचवर्कची कामे गतीने करण्यात यावीत; शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा नदी या रस्त्यांचे काम तत्काळ सुरू करावे; नवीन रस्ता करण्यापूर्वी पाणीपुरवठा, ड्रेनेज विभाग, वॉर्ड आॅफिस व विद्युत कंपनी यांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना
कोल्हापूर : शहर स्वच्छतेच्या कामाकरिता आरोग्य विभागाकडे कर्मचारी अपुरे पडत असल्याने कर्मचारी पुरवठा करणाऱ्या खासगी ठेकेदाराकडून तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचा निर्णय गुरुवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर होत्या.
महापालिकेच्या आरोग्य, नगररचना, पाणीपुरवठा, वाहतूक व विभागीय कार्यालय यांच्याकडील प्रकल्पांचा आढावा महापौर लाटकर यांनी गुरुवारी घेतला. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शहरातील प्रमुख मार्गांवरील फूटपाथवर उगवलेली झाडेझुडपे काढावीत, त्यांची स्वच्छता करण्यात यावी, शहरातील रस्त्यांची पॅचवर्कची कामे गतीने करण्यात यावीत; शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा नदी या रस्त्यांचे काम तत्काळ सुरू करावे; नवीन रस्ता करण्यापूर्वी पाणीपुरवठा, ड्रेनेज विभाग, वॉर्ड आॅफिस व विद्युत कंपनी यांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना महापौर लाटकर यांनी यावेळी दिल्या. अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम व रिस्टोलेशनचे काम प्रगतिपथावर नाही. त्यांच्या कामाचे अद्याप नियोजन झालेले नाही याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली.
शहरातील बंदिस्त झालेल्या २१ ठिकाणांचे पार्किंग खुले करण्यात आले असून ही कारवाई अधिक तीव्र करून सदरचे पार्किंग नागरिकांना खुले करून द्यावे, असे महापौरांनी सांगितले. वाहतूक विभागाशी चर्चा करून शहरातील पार्किंग, नो पार्किंग, सम व विषम पार्किंग झोन निश्चित करण्याचे बैठकीत ठरले. व्हीनस कॉर्नर येथील वाहनतळावर अंबाबाई मंदिराकडे येणारी वाहने लावण्यास तत्काळ सुरू करण्याचेही यावेळी ठरले.
याप्रसंगी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, नगरसेविका स्वाती यवलुजे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, साहाय्यक संचालक प्रसाद गायकवाड, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, प्रभारी जलअभियंता कुंभार, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, रावसाहेब चव्हाण, आर. के. जाधव, इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, उपशहर रचनाकार नारायण भोसले, एन. एस. पाटील, आदी उपस्थित होते.
* आठ दिवसांत खासगी कर्मचारी नियुक्ती
* शिवाजी चौक ते गंगावेश रस्ता चार दिवसांत
* अमृत योजनेचे काम बार चार्टप्रमाणे
* बंदिस्त पार्किंगवर अधिक गतीने कारवाई