‘गोकुळ’, ‘राजाराम’च्या निवडणुकीतून कार्यकर्त्यांना बळ

By admin | Published: June 16, 2015 12:54 AM2015-06-16T00:54:31+5:302015-06-16T01:17:33+5:30

सतेज पाटील : पाच लाख एकवीस हजार विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप होणार

Empowering the workers from 'Gokul', 'Rajaram' elections | ‘गोकुळ’, ‘राजाराम’च्या निवडणुकीतून कार्यकर्त्यांना बळ

‘गोकुळ’, ‘राजाराम’च्या निवडणुकीतून कार्यकर्त्यांना बळ

Next

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ व राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवून गटाची बांधणी करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे केले.
कळंबा (ता. करवीर) येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालयात सतेज पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांच्या स्वरूपात जमा झालेल्या वह्यांचे वाटप झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, ऋतुराज पाटील, करवीर पंचायत समितीच्या सभापती पूनम जाधव, महापालिका महिला व बालकल्याण समिती सभापती लीला धुमाळ, संगीता देवेकर, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक चंद्रकांत घाटगे, भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सदाशिव चरापले, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गगनबावडा तालुकाध्यक्ष बजरंग पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यंदा एक लाख सात हजार ५१३ वह्या पाच लाख २१ हजार ४०१ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. सोमवारी प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना सतेज पाटील यांच्या हस्ते वह्या वाटप झाले. आज, मंगळवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद व महापालिकेच्या ४००हून अधिक शाळांमध्ये एकाचवेळी वह्यांचे वाटप होणार आहे.
माजी मंत्री पाटील म्हणाले, २००७ पासून वाढदिवसानिमित्त हार-तुऱ्यांऐवजी वह्या संकलित करण्याचा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. २०१५च्या निवडणुकीतील पराभवाने आपण सर्वजण दोन पावले मागे गेलो होतो. मात्र, कार्यकर्त्यांशी असलेला ऋणानुबंध पाहता वह्या संकलनास चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन मोठे झाल्यावर आपण शिकलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी.
प्रल्हाद चव्हाण म्हणाले, जीवनात हार-जीत होत असते. सूर्यालाही ग्रहण लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निराश होण्याची गरज नाही. सतेज पाटील यांनी खचून न जाता आपले काम सुरू ठेवले आहे. सर्वसामान्यांसाठी झगडणारा लढाऊ नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे.
महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे सदस्य भरत रसाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मंगल वळकुंजे, मनीषा वास्कर, ‘गोकुळ’चे माजी संचालक बाबासाहेब चौगले, पृथ्वीराज पाटील, शाहू साखर कारखान्याचे संचालक बसगोंडा पाटील, नगरसेवक उदय जाधव, दिलीप टिपुगडे, प्राचार्य महादेव नरके, आदींसह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)


जनतेला आता आपली चूक कळली : चव्हाण
पराभवानंतरही सतेज पाटील यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. त्यांनी ते असेच सुरू ठेवावे. भविष्यात निश्चित यश मिळेल.
कारण जनतेला आता आपली चूक कळली आहे, अशी अप्रत्यक्ष टीका प्रल्हाद चव्हाण यांनी केली.

Web Title: Empowering the workers from 'Gokul', 'Rajaram' elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.