इचलकरंजीत पावसाळ्यापूर्वी आरोग्य सुविधा सक्षम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:39+5:302021-06-16T04:32:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : सध्या मान्सूनला सुरूवात झाली असून, शहरातील सर्वच सारण गटारांची तातडीने स्वच्छता व साफसफाई करुन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : सध्या मान्सूनला सुरूवात झाली असून, शहरातील सर्वच सारण गटारांची तातडीने स्वच्छता व साफसफाई करुन घ्यावी. डेंग्यूची साथ उद्भवू नये यासाठी सर्वेक्षण करुन भागात औषध फवारणी करून पावसाळ्यापूर्वी आरोग्य सुविधा सक्षम करण्याच्या सूचना नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
शहरातील आरोग्य सुविधा व उपाययोजनांसंदर्भात चर्चा करण्यासाठी नगराध्यक्षांनी आरोग्य विभागातील अधिकारी व प्रमुखांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये सद्यस्थितीची माहिती जाणून घेत काही प्रभागांमधील सारण गटारांची स्वच्छता न झाल्याने संबंधित मक्तेदाराला आठवडाभरात गटारांची स्वच्छता करण्याच्या सूचना केल्या. तसेच कचरा डेपोवरील कचऱ्याचे सपाटीकरण करण्याचे काम बंद असल्याने संबंधित मक्तेदाराला तत्काळ काम सुरु करण्यास सांगितले. त्याचबरोबर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासह श्वानांचे निर्बिजीकरणाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या कामांबाबत पुढील आठवड्यात पुन्हा आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला आरोग्य सभापती संजय केंगार, विश्वास हेगडे, सूर्यकांत चव्हाण, विजय पाटील, आदी उपस्थित होते.