‘ब्रेल लिपी’ वाचविण्यासाठी ‘सक्षम’ पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:49 AM2019-01-16T00:49:31+5:302019-01-16T00:49:37+5:30
संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना वाचन, लेखनाबाबत स्वावलंंबी बनविण्यात ब्रेल लिपी मोठी उपयोगी ठरणारी ...
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना वाचन, लेखनाबाबत स्वावलंंबी बनविण्यात ब्रेल लिपी मोठी उपयोगी ठरणारी आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून स्मार्टफोनचा वाढता वापर, त्यातील विविध अॅप्लिकेशनमुळे ब्रेल लिपीचा या विद्यार्थ्यांना विसर पडत आहे. त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. ही लिपी वाचविण्याकरिता दृष्टिबाधितांसाठी काम करणाऱ्या ‘सक्षम’ संस्थेने पाऊल टाकले आहे.
‘सक्षम’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये पाचवी ते दहावीपर्यंतचे दृष्टिबाधित विद्यार्थी हे ब्रेललिपीचे शिक्षण घेण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले. शाळा, महाविद्यालयांतील विविध परीक्षांवेळी हे विद्यार्थी लेखनिक (रायटर) सुविधेचा उपयोग करून घेत असल्यानेही काहीजण ब्रेललिपीचे शिक्षण घेण्यास महत्त्व देत नसल्याचे चित्र आहे. मात्र, दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना ब्रेललिपी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरणारी असल्याने ‘सक्षम’ संस्थेने त्याबाबत मार्गदर्शनाचा उपक्रम गेल्या चार वर्षांपूर्वी सुरू केला. त्या अंतर्गत या विद्यार्थ्यांना ब्रेललिपीतील विविध पुस्तके, ही लिपी शिकताना येणाºया अडचणींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन वर्ग असे विविध उपक्रम राबविले जातात. नव्या वर्षात ब्रेललिपीचे वाचन, लेखन स्पर्धा घेतली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. या संस्थेचा हा उपक्रम उल्लेखनीय ठरणारा आहे.
‘ब्रेललिपी’चे महत्त्व असे
स्मार्टफोन, आयपॉडवर अॅडिओ क्लिपच्या माध्यमातून दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेचा अभ्यासक्रम उपलब्ध होतो. याबाबतची काही अॅप्लिकेशनही उपलब्ध आहेत. त्यातून या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगली मदत होते. परीक्षांमध्ये चांगले गुण मिळतात. मात्र, लेखन करायचे असल्यास त्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते. पण, ब्रेललिपीचे ज्ञान असल्यास स्वत:ला हव्या त्यावेळी लेखन करता येते. त्यामुळे या लिपीचे महत्त्व आहे.
आता दरवर्षी होणार स्पर्धा
संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या पातळीवर ब्रेललिपीकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ब्रेल लिपी वाचविण्यासह ती विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अधिक प्राधान्याने आम्ही गेल्या चार वर्षांपूर्वी मार्गदर्शनाचा उपक्रम सुरू केला असल्याचे ‘सक्षम’चे सदस्य संतोष गाताडे यांनी सांगितले. ते म्हणाले, दृष्टिबाधित विद्यार्थी, दिव्यांगांसाठी ‘सक्षम’चे अध्यक्ष गिरीश करडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या वर्षी ब्रेललिपीचे वाचन, लेखन स्पर्धा घेतली. ही स्पर्धा आता दरवर्षी घेणार असून, तिची व्याप्ती वाढविली जाणार आहे.