आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणार
By admin | Published: May 21, 2016 12:06 AM2016-05-21T00:06:50+5:302016-05-21T00:11:18+5:30
राजकुमार बडोले : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती, जमातींचा मेळावा
कोल्हापूर : समाजातील जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाहास शासन प्रोत्साहन देणार आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी केले.भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती-जमाती आघाडीतर्फे आयोजित नूतन पदाधिकारी निवड व मेळाव्यात ते बोलत होते. आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. येथील शाहू सभागृहात मेळावा झाला. मंत्री बडोले म्हणाले, आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यास दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्राथमिक चर्चा झाली आहे. याशिवाय त्या दाम्पत्याच्या मुलास शासकीय नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. नवबौद्धांना राज्य शासन सवलती देत आहे. त्याप्रमाणे केंद्र शासनाकडूनही सवलती मिळाव्यात, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दलित उद्योजकांना कौशल्यशिक्षण देण्यासाठी नवीन संस्था सुरू करण्यात येतील. या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन दलित उद्योजकांना संधी उपलब्ध करून देवू.अजूनही जातीचा दाखला काढणे, पडताळणी करणे किचकट असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे लवकरच जिल्हानिहाय जात पडताळणी समितीचे कामकाज सुरू होईल. रमाई आवास योजनेतून दारिद्र्यरेषेखालील मागासर्गीय बेघरांना घरासाठी जागाखरेदीसाठी ५० हजार रुपये दिले जातात. त्यामध्ये वाढ करण्यात येईल. कॉँग्रेस पक्षाने निवडणुकांसाठी दलितांचा वापर केला. मात्र विकासाकडे दुर्लक्ष केले. भाजप सत्तेवर आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी झाली. डॉ. आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी शासन नियोजनबद्ध प्रयत्नशील आहे.
आमदार हाळवणकर म्हणाले, काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणास कंटाळून दलित, मागासवर्गीय मतदारांनी देशात आणि राज्यात भाजपला निवडून दिले. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री बडोले मागासवर्गीयांसाठी प्रभावीपणे काम करीत आहेत. त्यामुळे पुढील २५ वर्षांत राज्यात भाजप सत्तेवर राहील.
यावेळी अनुसूचित जातिजमातींच्या आघाडीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली. आघाडीचे अध्यक्ष प्रशांत धनवडे यांनी प्रास्ताविक केले. अमित कांबळे, राजेंद्र सरनाईक, अशोक कांबळे, सुनील इंगवले, दयानंद कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हाळवणकरांना मंत्रिपद द्यावे
राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. यामध्ये आमदार सुरेश हाळवणकर यांनाही मंत्रिपद मिळावे, अशी मागणी यावेळी सूत्रसंचालकांनी केली. मात्र यावर मंत्री बडोले यांनी भाष्य केले नाही.
पगाराची चिंता अधिक
जिल्हा परिषद शाळेतील मास्तरला मुलांपेक्षा पगाराची अधिक चिंता असते. अशा शाळेतच मीही अनेक हालअपेष्टा, अवहेलना सहन करीत शिकलो, असे मंत्री बडोले यांनी सांगितले.