लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:10+5:302021-01-19T04:26:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनापासून सर्वांचा बचाव होण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याची सुुरुवात डॉक्टर, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनापासून सर्वांचा बचाव होण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याची सुुरुवात डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेऊन करावी, कोणी नकार देत असेल तर त्यांना सकारात्मक बाबी सांगून लस घेण्यासाठी प्रोत्साहित करा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली.
कोल्हापुरात शनिवारपासून कोविशिल्ड या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, डॉ. हर्षला वेदक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसीकरणाचे कुणावर दुष्परिणाम झाले का अशी विचारणा केली.
लसीकरणासाठी आधी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढे यावे. लस घेतल्यानंतर काही दुष्परिणाम जाणवल्यास तातडीने त्याची दखल घ्या व त्यांच्यावर उपचार सुरू करा. लसीकरणानंतरचे आपले अनुभव अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगा, अनाठायी भीती बाळगू नका असे सांगून त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करा, लसीकरणाची संख्या वाढवा, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.
---