महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन द्या
By Admin | Published: March 9, 2016 12:28 AM2016-03-09T00:28:16+5:302016-03-09T00:55:05+5:30
डिंपल कपाडिया : महिला दिनानिमित्त ‘गृहिणी जागर स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रम उत्साहात
कोल्हापूर : महिलांना जगण्याचा मूलभूत अधिकार असून तो अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने योगदान देणे आवश्यक आहे. शिवाय कुटुंबाच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी येथे केले.
महानगरपालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टतर्फे मंगळवारी आयोजित ‘गृहिणी जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमात त्या बोलत होते. जागतिक महिला दिनानिमित्त केशवराव भोसले नाट्यगृहातील कार्यक्रमास आमदार सतेज पाटील, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, करवीर आदर्श महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, आदी उपस्थित होते.
कपाडिया म्हणाल्या, एक महिला कुटुंबाला आनंदित, सक्षम बनवू शकते. त्यामुळे कुटुंबासह समाजही आपोआप आनंदित, सक्षम होईल. ते लक्षात घेऊन प्रत्येकाने कार्यरत राहावे. महिला सबलीकरणासाठी ‘गृहिणी जागर’सारख्या कार्यक्रमांची गरज आहे. आमदार सतेज पाटील म्हणाले, विविध क्षेत्रांतील कार्यरत महिलांना एकत्रित करून स्त्री-सबलीकरणाचा चांगला उपक्रम राबविला आहे. त्यातून महिलांचे जगणे समृद्ध होण्यास मदत होत आहे.
महापौर रामाणे म्हणाल्या, महिलांनी विविध क्षेत्रांत कार्यरत राहून स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रतिमा पाटील म्हणाल्या, करवीर आदर्श महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. नगरसेवक प्रवीण केसरकर, शारंगधर देशमुख, लाला भोसले, नियाज खान, वहिदा सौदागार, ऋतुराज पाटील, आदी उपस्थित होते. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले. महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम यांनी आभार मानले. दरम्यान, ‘गृहिणी जागर स्त्रीशक्तीचा’ अंतर्गत दिवसभर समूहनृत्य, फॅशन शो, मिसेस गृहिणी, मिस युवती, आदी स्पर्धा झाल्या. (प्रतिनिधी)
नारीशक्तीचा गौरव
कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यात ऋतुजा कवडे, रमा पोतनीस, जयश्री बोरगी, अनुजा पाटील, प्रियांका जाधव, लीना नायर, तोषवी भगवान, खुर्शीद जोडहट्टी, दीपलक्ष्मी गुर्जर, प्रियांका पाटील, सुनीती देशमुख, रजनीगंधा वेळापुरे, विद्या काळे, गौरी चोरगे, सरिता सुतार, अनुराधा वांडरे, जिजाबाई कांबळे, सखू कांबळे यांचा समावेश होता.
लई आभारी...
‘नमस्कार, मला कोल्हापूरला यायला आवडते’ या हिंदी टोनमधील मराठी वाक्याने डिंपल कपाडिया यांनी बोलायला सुरुवात केली. सर्वसामान्य महिलांचा आजच्या कार्यक्रमात सत्कार केल्याचे मला आवडले, याबद्दल मी सर्वांची लई आभारी हाय ! कपाडिया यांच्या मराठी बोलण्याला उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.