कोल्हापुरात काम करणे उत्साहवर्धक
By admin | Published: May 31, 2016 01:17 AM2016-05-31T01:17:02+5:302016-05-31T01:19:43+5:30
निरोप समारंभ : बदली झालेल्या न्यायाधीशांच्या भावना; असोसिएशनतर्फे सत्कार
कोल्हापूर : कोल्हापुरात काम करणे अत्यंत उत्साहवर्धक तसेच कायद्याच्या नवनवीन तरतुदींची माहिती मिळणे, अशा स्वरूपाचा कार्यकाल मिळाल्याबद्दल बदली झालेल्या न्यायाधीशांनी कोल्हापुरात समाधान व्यक्त केले.
सोमवारी जिल्हा बार असोसिएशनतर्फे येथील न्यायसंकुलाच्या एका हॉलमध्ये त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अवचट होते.
कोल्हापूर जिल्हा न्यायालयामधील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. पाटील, एम. बी. तिडके यांची अनुक्रमे अहमदनगर (श्रीरामपूर) व सिंधुदुर्ग (ओरोस) या ठिकाणी बदली झाली. तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे व एस. ओ. पांडे यांची बीड (केज) व ठाणे (उल्हासनगर) या ठिकाणी बदली झाली आहे.
बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांनी प्रास्ताविक केले. मोरे यांनी इमारतीमधील गैरसोयीबद्दल तसेच पक्षकार व वकिलांना असलेल्या अपुऱ्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यास अवचट यांनी लवकरच तोडगा काढून सर्व अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. सेक्रेटरी एस. एस. खोत यांनी जलद व सुलभ न्यायदान होण्यासाठी बार व बेंचमध्ये सशक्त वातावरण असणे आवश्यक असते. अशा कार्यक्रमांमुळे पक्षकारांना सुलभ व वेळेत न्याय मिळणे शक्य होते, असे सांगितले. सचिव अॅड. एस. एस. खोत यांनी सूत्रसंचालन केले.
समारंभास माजी अध्यक्ष अॅड. व्ही. एन. घाटगे, सहसचिव अॅड. अंशुमन कोरे, लोकल आॅडिटर अॅड. प्रशांत पाटील, महिला प्रतिनिधी अॅड. मेघा पाटील, सदस्य मिथुन भोसले, शहाजी पाटील, धैर्यशील पवार, संदीप चौगुले, अनुजा देशमुख, गुरुनाथ हारगे यांच्यासह वकील बांधव उपस्थित होते. उपाध्यक्ष
अॅड. अरुण पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कोल्हापूर जिल्हा न्यायालयातून बदली झालेल्या न्यायाधीशांच्या निरोप समारंभात बोलताना न्यायाधीश आर. डी. पाटील. यावेळी न्यायाधीश सुनील वेदपाठक, अॅड. अरुण पाटील, अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे, न्यायाधीश अवचट, न्यायाधीश एम. बी. तिडके, अॅड. दिलीप मंगसुळे उपस्थित होते.