कोतोली फाटा ते नांदगाव रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:23 AM2021-03-14T04:23:32+5:302021-03-14T04:23:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : कोतोली फाटा ते नांदगाव या तीस किलोमीटर मुख्य वाहतुकीच्या रस्त्याशेजारी नागरिकांनी जागोजागी अतिक्रमण केल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
करंजफेण : कोतोली फाटा ते नांदगाव या तीस किलोमीटर मुख्य वाहतुकीच्या रस्त्याशेजारी नागरिकांनी जागोजागी अतिक्रमण केल्याने सध्या या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. वर्षभरात या मार्गावर अपघात होऊन पाचजणांचा बळी जाऊनही बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेत या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. पन्हाळा पश्चिम परिसराला जोडणाऱ्या या प्रमुख मार्गावर दत्त दालमिया कारखाना, कोतोली व नांदगाव मुख्य बाजारपेठ असून, हा मार्ग अणुस्कुराला जाण्यासाठी सोईचा आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते.
या मार्गावरून सध्या दालमिया कारखान्याला ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, या मार्गावरील अनेकांनी रस्त्याला लागूनच व्यवसायासाठी जागोजागी खोके उभारले आहेत. त्याचबरोबर रस्त्याच्या शेजारी शेणाचे ढीग, लाकूड साहित्य, सिमेंटचे पाईप, दगडांचे ढीग असे साहित्य अस्ताव्यस्त ठेवल्याने रस्त्याच्या बाजूपट्ट्याही नामशेष झाल्या आहेत. या मार्गावर अनेक ठिकाणी बांधकाम विभागाने बाजूपट्ट्या न भरल्याने वाहन चालवणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे वाहनाला ओव्हरटेक करताना दुचाकींचा अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, या अपघातांनंतरही बांधकाम विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
कोट
रस्त्याची रूंदी कमी असून, रस्त्यावर जागोजागी लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे समोरून येणारे वाहन पास करताना कसरत करावी लागते. त्यामुळे अनेकवेळा अपघात झाले असून, वाहनचालक जखमी झाले आहेत. मात्र, येथील अतिक्रमणाकडे बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.
- सुरज चौगले
प्रवासी
फोटो : कोतोली फाटा - नांदगाव मुख्य रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण झाले असून, रस्त्याच्या बाजूपट्ट्या गायब झाल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे.
१३ कोतोली फाटा