बेकायदेशीर फार्म हाऊसचे गगनबावड्यात अतिक्रमण

By admin | Published: June 13, 2017 12:12 AM2017-06-13T00:12:15+5:302017-06-13T00:12:15+5:30

तलावाभोवतीही इमारती : बांधकाम परवान्याच्या चौकशीची गरज

Encroachment of illegal farm house in Gaganbawr | बेकायदेशीर फार्म हाऊसचे गगनबावड्यात अतिक्रमण

बेकायदेशीर फार्म हाऊसचे गगनबावड्यात अतिक्रमण

Next

चंद्रकांत पाटील ।  -लोकमत न्यूज नेटवर्क
गगनबावडा : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला असणारा गगनबावडा तालुका म्हणजे निसर्गाने नटलेला तालुका होय. दऱ्या-खोऱ्यात वसलेली गावे आणि त्यात सौंदर्य वाढविणारे वेसरफ, लखमापूर, कोदे व अणदूर हे चार तलाव आहेत. या तलावांभोवती कोणतीही मान्यता न घेता कित्येक उच्चभ्रू लोकांनी आपली फार्म हाऊस उभी केलेली आहेत. धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून, यावर कारवाई करण्याची गरज आहे.
या तलावांभोवती असणाऱ्या जमिनीला एरव्ही हजारातही एकराला किंमत नव्हती, परंतु अगदी घराघरांत जमिनीचे एजंट निर्माण झाले आणि एजंटांच्या वाढत्या संख्येने धनवान लोक लाखाच्या पुढे गुंठ्याला किंमत मोजून ही जमीन खरेदी करू लागले. मुळात या जमिनीमध्ये लाखो रुपये खर्च करून शेती करणे नगण्यच आहे. तरीही येथे मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला गेला. हा पैसा नेमका आला कोठून?हा यक्षप्रश्न आहे. या ठिकाणी प्रशस्त बंगले अस्तित्वात येऊ लागले. हे बंगले बांधताना किती लोकांनी परवाना घेतला, हा संशोधनाचा विषय आहे. तलावाशेजारी बांधकाम करताना पाटबंधारे विभागाचा परवाना आवश्यक असून, कित्येकजणांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. काही लोकांनी वारेमाप रुपये खर्च करून आपला पैसा जमिनीत गुंतवला असून, तेथे टोलेजंग बंगले बांधून सुटीच्या काळात मोठ्या प्रमाणात पार्ट्या रंगताना दिसतात. त्याचबरोबर तेथे मद्यपी लोकांचा वावर वाढताना दिसून येतो. गगनबावड्यात विदर्भ, मराठवाडा याबरोबर परराज्यातील लोकांनीही जमिनी घेऊन आपला पैसा मुरविला आहे. कित्येक ठिकाणी जमीन विकणारे शेतकरीच (मूळ मालक) तेथे कामगार म्हणून काम करीत आहेत. या बेकायदेशीर बांधकामावर आळा घालणे गरजेचे असून, तहसील विभाग या विषयावर कोणती भूमिका घेतोय, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



सर्वसामान्यांची : मोठी फरफट
सर्वसामान्य शेतकऱ्याला शेतात घर बांधायचे असले तरी आरोग्य, महावितरण, सार्वजनिक बांधकाम येथपासून ते तहसील कार्यालयापर्यंत खेटे मारावे लागतात. धनदांडग्यांचे फार्म हाऊस मात्र काही दिवसांत कसे उभे राहतात, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत, तालुक्यातील कोदे धरण, वेसरफ धरण, अंदूर धरण, असलज, शेणवडे, बोरबेट अशा गावांबरोबरच तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी बाहेरच्या मंडळींनी व्यापल्याचे सांगितले जाते. या सर्वच परिसरात आलिशान फार्म हाऊसबरोबरच फ्लोटिंगची कामे सुरू आहेत. त्यापैकी कितीजणांनी परवानगी घेतली, हा संशोधानाचाच प्रश्न आहे.
स्थानिक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीचे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे; पण दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न आहे. फार्म हाऊसला विरोध नाही; पण शेतीला मारक कचरा शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. अनेक फार्म हाऊसच्या शेजारच्या शेतीत पीक घेणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. कारण तेथील वर्दळ, प्लास्टिकपासून काचेच्या बाटल्यांपर्यंतचा कचरा यामुळे शेती नापीक होऊ लागली आहे.

तलाठ्यांचा दणका
तालुक्यातील चार ठिकाणी तलाव असूनही अणदूर गावकामगार तलाठ्यांनी पंधरा बेकायदेशीर बांधलेल्या घरांबाबत दि. ०७/०४/२०१७ ला तहसील कार्यालयात अहवाल पाठवून बेकायदेशीर घरे बांधल्याचे उघडकीस आणले आहे. त्यामुळे तहसील विभागाने त्यांना नोटीस दिल्या आहेत. अणदूर तलाठी हे करू शकतात, तर बाकी तीन ठिकाणी तलावाभोवती बांधकाम असणाऱ्या गावांतील गावकामगार तलाठी का करू शकत नाहीत?

Web Title: Encroachment of illegal farm house in Gaganbawr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.