मणिकर्णिका कुंडावरील अतिक्रमण तातडीने हटवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:45+5:302021-04-02T04:23:45+5:30
कोल्हापूर : मणिकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम माऊली लॉजच्या अतिक्रमणामुळे थांबले आहे. तरी हे अतिक्रमण महापालिकेने तातडीने उतरवून घ्यावे. कुंडात ...
कोल्हापूर : मणिकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम माऊली लॉजच्या अतिक्रमणामुळे थांबले आहे. तरी हे अतिक्रमण महापालिकेने तातडीने उतरवून घ्यावे. कुंडात जाणारे ड्रेनेजचे पाणी थांबविण्यासाठी पाईपलाईन मंदिराबाहेरून वळवण्यात यावी, अन्यथा पूर्व दरवाजासमोरील जागेचे सर्वाधिकार देवस्थान समितीला द्यावेत, समितीच्यावतीने हे काम पूर्ण केले जाईल, असा प्रस्ताव अध्यक्ष महेश जाधव यांनी गुरुवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिला.
मणिकर्णिका उत्खननाचे काम आता पूर्ण झाले असून, केवळ माऊली लॉजच्या अतिक्रमणाखालील जागेचे काम शिल्लक आहे. याबाबत गुरुवारी दुपारी अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपात हेरिटेज समितीची बैठक झाली. त्यानंतर सर्वांनी महापालिका प्रशासक बलकवडे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. अध्यक्ष जाधव म्हणाले, बांधकाम नियमावली मोडून ही इमारत उभारण्यात आली आहे. महापालिकेने एक नोटीस पाठविण्यापलीकडे कारवाई केलेली नाही. तरी हे अतिक्रमण तातडीने हटवून ही जागा देवस्थानला परत द्यावी.
सध्या कुंडातील सात झरे खुले झाले आहेत. मात्र त्यात महापालिकेच्या ड्रेनेजलाईनचे पाणी येत आहे. ही पाईपलाईन सरलष्कर भवन ते गाडगे महाराज पुतळामार्गे बाहेरुन वळवून घेण्यात यावी, अशी मागणी समितीने केली होती, मात्र त्यासाठी २५ ते ३० लाख खर्च होणार असून, हे काम समितीनेच करावे, असे महापालिकेचे म्हणणे आहे. तसे असेल, तर आम्हाला सरलष्करसमोरील व भोवतीच्या परिसराच्या वापराचे सर्वाधिकार देण्यात यावेत, असा प्रस्ताव समितीने महापालिकेला दिला आहे. वरील दोन्ही पर्याय मान्य नसतील तर आम्ही पूर्व दरवाजाकडून ही पाईपलाईन बंद करू. मागे पाणी तुंबले, तर ती आमची जबाबदारी राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या चर्चेनंतर प्रशासक बलकवडे यांनी माऊली लॉजचा अडथळा व ड्रेनेज पाईपलाईन याची माहिती घेऊन लवकरात लवकर यावर मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी उपायुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, समिती सदस्य शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार, अभियंता सुदेश देशपांडे, प्रभारी अभियंता सुयश पाटील, अमरजा निंबाळकर आदी उपस्थित होते.
--
फोटो नं ०१०४२०२१-कोल-देवस्थान बैठक
ओळ : अंबाबाई मंदिराच्या मणिकर्णिका कुंडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. यावेळी समितीचे अध्यक्ष महेश जाधव, नितीन देसाई, शिवाजीराव जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
--