राजारामपुरीत व्यापाऱ्यांचे अतिक्रमण उद्धवस्त; कारवाई दरम्यान शिवीगाळ, अंगावर धावून जाण्याचा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 07:22 PM2022-05-11T19:22:19+5:302022-05-11T19:25:42+5:30
कारवाई दरम्यान शिवीगाळ तसेच अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात राखली.
कोल्हापूर : दुकानासमोर वाहने लावण्यासाठी सोडलेल्या जागेवर व्यापाऱ्यांकडून झालेले अतिक्रमण आज, बुधवारी महानगरपालिका प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने उद्धवस्त केल. या कारवाईने व्यापारी वर्गात एकच धावपळ उडाली. अतिक्रमण काढताना दोन ठिकाणी व्यापारी, कर्मचारी यांच्यात वादावादी झाली. शिवीगाळ तसेच अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात राखली.
काल, मंगळवारी राजारामपुरीतील जगदाळे हॉल जवळील उद्यानात पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक घेऊन राजारामपुरीतील सर्व रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने काढून टाका, अशा सक्त सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धडक कारवाईचा कार्यक्रम आखून दिला. नगररचना विभागातील उपशहर रचनाकार रमेश मस्कर, विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता बाबुराव दबडे यांनी मंगळवारी दुपारनंतर सर्वेक्षण केले. त्यानंतर प्रत्यक्ष आज, बुधवारी दुपारी धडक कारवाईला सुरवात केली.
प्रशासकांनी केली कारवाईची पाहणी
प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी दुपारी राजारामपुरी परिसराला भेट देऊन कारवाईची पाहणी केली. तसेच कोणाची गय करु नका, झालेले सर्व अतिक्रमण काढून टाका अशा सूचना दिल्या. कारवाईवेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही