Kolhapur: विशाळगडावरील अतिक्रमण, वाघनख्याबाबत खासदार शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले..
By भारत चव्हाण | Published: July 9, 2024 06:56 PM2024-07-09T18:56:41+5:302024-07-09T18:59:09+5:30
तिसऱ्या आघाडीचा उद्देश काय?
कोल्हापूर : एखाद्या प्रश्नातून काही गडबड होऊ नये, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाचे काम आहे. त्यामुळे जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाने विशाळगडप्रश्नी दोन्ही घटकांशी संवादातून, चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन खासदार शाहू छत्रपती यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. विषय जास्त ताणला जाईपर्यंत प्रशासनाने वाट पाहू नये, असेही ते म्हणाले.
विशाळगडावरील अतिक्रमण आणि पशुहत्या याबाबत माजी खासदार संभाजीराजे दि. १३ जुलै रोजी विशाळगडावर जाऊन शिवभक्तांच्या उपस्थितीत आंदोलन करणार आहेत, तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनीही आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार शाहू छत्रपती यांना त्यांची भूमिका विचारली.
त्यावेळी त्यांनी सांगितले की, विशाळगड येथे स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न आहे. अतिक्रमण हा प्रश्न केवळ एका घटकाला लागू नाही सर्वांना लागू आहे. अतिक्रमण असेल तर त्यावर प्रशासन योग्य कारवाई करेल. सर्वांनी एकत्र बसून हा विषय मिटविण्याची गोष्ट आहे. न्याय प्रविष्ट बाब असली तरी सर्वांनी एकत्र येत हा विषय मिटू शकतो. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने पुढाकार घेऊन दोन्ही बाजूशी चर्चा करून त्यातून मार्ग काढला पाहिजे.
तिसऱ्या आघाडीचा उद्देश काय?
संभाजीराजे आणि आमदार बचू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीबाबत छेडले असता शाहू छत्रपती म्हणाले की, ते दोघे एकत्र येण्याचा विचार करत आहेत, असे तुमच्याकडून समजले; पण त्यांचा उद्देश काय आहे हे कळाल्याशिवाय त्यावर बोलणे उचित नाही; पण ते महाविकास आघाडीत येणार असतील तर तेव्हाचा विषय तेव्हा हाताळू.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखं कोणते हे सांगणे कठीण
लंडनहून आणल्या जाणार असलेल्या वाघनख्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी काही पुराव्यानिशी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत असा दावा केला आहे. ते बरोबर आहे की नाही हे शोधले पाहिजे. त्यावर संशोधन व्हायला पाहिजे. वाघनखं दुर्मीळ आहेत, असे नाही; परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखं कोणते हे सांगणे कठीण आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
खासदार शाहू छत्रपती यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी फोनवर संपर्क साधून विशाळगडचा प्रश्न व्यवस्थित हाताळण्याच्या, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. सर्व संबंधितांची बैठक घेऊन यातून मार्ग काढा, माझी आवश्यकता असेल तर मलाही बोलवा, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.