अतिक्रमणावरून हुपरीत धुमश्चक्री
By admin | Published: September 13, 2015 12:45 AM2015-09-13T00:45:03+5:302015-09-13T00:45:03+5:30
परस्परविरोधी फिर्याद : मिरचीपूड टाकून महिला सरपंचांसह सदस्यांना मारहाण
हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील अंबाबाई वसाहतीमधील अतिक्रमण थांबविण्यासाठी पोहोचलेल्या सरपंच वंदना दादासो पाटील, उपसरपंच सुभाष गोटखिंडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना चटणीपूड टाकून जमावाने मारहाण केली. सरपंच व सदस्यांनीही अतिक्रमणधारकांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यावेळी यळगूडचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमा झाले होते. फिर्याद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.
जवाहर कारखान्याच्या पिछाडीस असलेल्या यळगूडच्या हद्दीमध्ये अंबाबाई वसाहतीमध्ये गणेश रजपूत यांच्यासह अन्य काहीजणांनी बेकायदेशीर अतिक्रमण क रून घरांचे पक्के बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. याबाबत सरपंच वंदना पाटील, उपसरपंच सुभाष गोटखिंडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य घटनास्थळी गेले. यावेळी अतिक्रमणधारकांच्या बरोबर ग्रामपंचायत प्रशासनाशी वाद सुरूझाला. यातच अंगावर जाणे, शिवीगाळ करणे, झोंबाझोंबी झाली. दरम्यान, अतिक्रमण करून बांधकाम करीत आहात असे म्हणून सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी मारहाण करीत अंगावरचे कपडे फाडले. याबाबत आम्ही हुपरी पोलीस ठाण्यात आलो असता ग्रामपंचायतीने जे.सी.बी.ने बांधकाम पाडून सांसारिक साहित्यांची नासधूस केली, तसेच बांधकामासाठी आणलेली २५ हजारांची रक्कम लंपास केली. तरी या प्रकरणी सरपंच वंदना पाटील, उपसरपंच सुभाष गोटखिंडे, आण्णासो पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार ज्योती गणेश रजपूत यांनी फिर्यादीत केली आहे. दरम्यान, या प्रकारामध्ये तडजोड करण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न चालू होते. मात्र, रात्री उशिरा परस्परविरोधी फिर्यादी पोलिसांत दाखल करण्यात आल्या.