खुल्या, आरक्षणातील जागांवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:34+5:302020-12-09T04:18:34+5:30
महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गेल्या २५ नोव्हेंबरला अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील अतिक्रमणाचा आढावा घेतला. त्यावेळी महापालिकेच्या मालकीच्या ...
महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गेल्या २५ नोव्हेंबरला अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील अतिक्रमणाचा आढावा घेतला. त्यावेळी महापालिकेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमण चर्चेत आले. महापालिकेच्या मालकीच्या अनेक जागांवर खासगी मालकांनी अतिक्रमणे केली आहेत ही बाब प्रशासक बलकवडे यांच्या निदर्शनास आली तेव्हा अतिक्रमण हटाव मोहीम ही पालिकेच्या जागांपासून करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण संबंधितांनी आठ दिवसांत काढून घ्यावे, अन्यथा सदरचे अतिक्रमण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढून टाकावे, अशा सूचना प्रशासकांनी अधिकाऱ्यांना दिल्या परंतु विभागीय कार्यालयातील अधिकारी अजूनही खुल्या जागांचा शोध घेत आहेत. जागांची यादी करत आहेत. यादी करण्याचे काम सुरुच आहे. नगररचना विभागाकडे शहरातील खुल्या जागांची नोंद व माहिती असताना विभागीय कार्यालयातील अधिकारी यादी तयार करत असल्याच्या नावाखाली वेळ दवडत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात विविध भागात पालिका प्रशासनाने वेगवेगळ्या कारणांने आरक्षण टाकली आहेत. आर्थिक परिस्थितीचे कारण देत त्या जागाही ताब्यात घेतल्या नसल्यामुळे मालकांच्याच ताब्यात आहेत. मूळ मालकांनी त्यावर अतिक्रमणे केली आहेत. या सर्व जागांची मालकी पाालिकेची असूनही त्या खासगी मालकांच्या ताब्यात आहेत. अनेक ठिकाणी अशा जागांचा गोदामासाठी वापर करून त्या भाड्यानेही दिल्या आहेत.