किणी टोलनाक्यावरील अतिक्रमणे हटवली
By admin | Published: May 1, 2016 12:47 AM2016-05-01T00:47:23+5:302016-05-01T00:47:23+5:30
खोकीधारकांनी स्वत:हून खोकी काढून घेतली
किणी : किणी टोलनाक्यावरील महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या चहाच्या टपऱ्यांवर (खोकी) राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कारवाई होण्याची माहिती मिळताच खोकीधारकांनी स्वत:हून खोकी काढून घेतली.
किणी टोलनाका अस्तित्वात आल्यानंतर तरुण बेरोजगार युवकांनी महामार्गाच्या कडेला चहाच्या टपऱ्या (खोकी) घातल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहतुकीस अडथळा होत असल्याचे कारण देत खोकी हटविण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी खोकीधारकांना याबाबत खोकी हटविण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. प्रातांधिकारी मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये ही अतिक्रमणे हटाव मोहीम राबविण्यात आली. जे.सी.बी. के्रन कर्मचारी व पोलिस फौजफाटा येणार असल्याची माहिती मिळताच संबंधित खोकीधारकांनी शनिवार सकाळपासूनच खोकी काढून घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, दोन जे.सी.बी., मोठी क्रेन, महामंडळाच्या हेल्पलाईनचे पन्नासहून अधिक कर्मचारी दाखल झाले. यावेळी मनीषा खत्री यांनी भेट देऊनी पाहणी करत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच खोकी काढल्यानंतर रिकाम्या झालेल्या जागेत चर काढण्याचे काम हाती घेतले. यावेळी दोन्ही बाजंूची ४४ खोकी काढल्याचे त्यांनी सांगितले. अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पेठवडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हातकणंगलेचे नायब तहसीलदार एस. एम. जोशी व राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता पी. यु. हिंगमिरे, महामार्ग मदतकेंद्राचे प्रकाश चाळके, एन. डी. काकडे, अखिलेश दंडवते, सर्जेराव निकम, आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेस कोणी विरोध केला नाही. मात्र, तीव्र नाराजी व्यक्त होत होती.