पंचतारांकितमधील गुंडगिरी संपवा
By admin | Published: January 6, 2017 12:15 AM2017-01-06T00:15:55+5:302017-01-06T00:15:55+5:30
उद्योजकांची मागणी : पोलिस ठाण्यासाठी समरजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली नांगरे-पाटील यांना निवेदन
कोल्हापूर : कागल - हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सध्या सुरू असलेली गुंडगिरी, दहशत आणि गुन्हेगारी संपवा. येथे स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करावे, अशी मागणी ‘शाहू ग्रुप’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखालील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ कागल-हातकणंगले (मॅक) या संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली.
घाटगे म्हणाले, ‘या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगवाढीला मोठी संधी आहे. मात्र, येथे वाटमारी, लूटमार, चोरी अशी गुन्हेगारी वाढल्याने सुरक्षा धोक्यात आहे. या वसाहतीमध्ये येत्या काही वर्षांत मोठ्या कंपन्या येतील. त्यांचे व्यवस्थापन प्रथम सुरक्षिततेची व्यवस्था पाहते. हे लक्षात घेऊन या औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे आवश्यक आहे.
‘मॅक’ चे अध्यक्ष संजय जोशी म्हणाले, ‘१०८९ हेक्टर क्षेत्र असलेल्या या वसाहतीत ४० हजार कामगार आहेत. पैकी दुसऱ्या व तिसऱ्या शिफ्टमध्ये १६ हजार कामगार काम करतात. यातील काही कामगारांना लुटणे, वाटमारीचे प्रकार, तसेच लहान-मोठ्या चोऱ्या होत आहेत. फाळकुटदादांची दहशत, गुंडगिरी यामुळे येथील सुरक्षिततेसाठी येथे स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करावे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाने पोलिस ठाण्यासाठी भूखंड मंजूर केला आहे. त्याचा ताबा पोलिस कार्यालयाने घेतलेला आहे. या पुढील कार्यवाही त्वरित व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या वसाहतीमधील दहशत, गुंडगिरी मोडून काढू, स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करण्याबाबतचा निर्णय प्रत्यक्ष भेट देऊन घेऊ. त्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात सत्यजित पाटील, शंतनू गायकवाड, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
समरजितसिंह : वसाहतीत राजकीय हस्तक्षेप
कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये काही कार्यकर्त्यांना नोकरी लावण्यासाठी राजकीय हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे गुणवत्ता व कौशल्य असलेल्या तालुक्यातील अनेक तरुणांना डावलले जाते. धमकी देऊन कंपन्यांचा ‘सीएसआर’ फंडाचा गैरवापर केला जात आहे. अशा स्वरूपातील राजकीय हस्तक्षेपामुळे या औद्योगिक वसाहतीमधील उद्योग विकासाला खीळ बसत असल्याचे ‘शाहू ग्रुप’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
चौकीत पुरेसे पोलिस हवेत
गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याने या औद्योगिक वसाहतीत पोलिस चौकी सुरू केली होती. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ती सध्या बंद अवस्थेत असल्याचे ‘मॅक’चे अध्यक्ष जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू होईपर्यंत या चौकीला पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. लक्ष्मी टेकडी-हुपरी रस्त्यावरील वाहतूक सुरक्षिततेसाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी.
पुढील वर्षी ‘शाहू’कडे अधिकाअधिक ऊस
सीमाभागातील काही कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस यंदा नेला आहे. त्यावर अध्यक्ष घाटगे म्हणाले, यावर्षी कारखान्याच्या क्षमतेपेक्षा जादा गाळप करू नये, अशी मर्यादा घातली आहे. मात्र, ‘शाहू’ची गाळप क्षमता वाढविणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाअधिक ऊस पुढील वर्षी ‘शाहू’कडे येईल.