स्मशानभूमीत कुडकुडणार पोरगं पाहिलं अन् तात्यांचे मन हेलावलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 10:50 AM2021-03-04T10:50:30+5:302021-03-04T10:54:11+5:30
kolhapur News-पंचगंगा घाटावर मुंडन सुरू असताना थंडीत नऊ-दहा वर्षाच्या एका मुलाला कुडकुडताना पाहून अंत्यदर्शनासाठी तेथे गेलेले फुलेवाडीतील संभाजी पांडुरंग जाधव (मिठारी तात्या) अस्वस्थ झाले. त्यांनी घाटावर गरम पाणी मिळण्यासाठी सोलर बसवण्याची कल्पना डोक्यात आणली आणि त्यांनी लगेच ती सत्यातही उतरवली. तत्काळ घरी जाऊन त्याची अंलबजावणी केली. तात्यांनी बसवलेला तोच सोलर आज पंचगंगा घाटावरील स्मशानभूमीत दिमाखात उभा आहे.
ज्योती पाटील
पाचगाव : पंचगंगा घाटावर मुंडन सुरू असताना थंडीत नऊ-दहा वर्षाच्या एका मुलाला कुडकुडताना पाहून अंत्यदर्शनासाठी तेथे गेलेले फुलेवाडीतील मिठारी तात्यांचे मन हेलावलं. ते अस्वस्थ झाले. त्यांनी घाटावर गरम पाणी मिळण्यासाठी सोलर बसवण्याची कल्पना डोक्यात आणली आणि त्यांनी लगेच ती सत्यातही उतरवली. तत्काळ घरी जाऊन त्याची अंलबजावणी केली. तात्यांनी बसवलेला तोच सोलर आज पंचगंगा घाटावरील स्मशानभूमीत दिमाखात उभा आहे.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले संभाजी जाधव हे फुलेवाडी परिसरात मिठारी तात्या या नावाने सर्वपरिचित असणारे व्यक्तिमत्व. त्यांना सर्वजण तात्या म्हणूनच हाक मारतात. पन्नाशी उलटून गेलेल्या तात्यांचा शेती हाच व्यवसाय असून जोडीला पिठाची गिरणीही चालवतात, यामध्ये त्यांच्या पत्नीचाही मोलाचा वाटा आहे.
फुलेवाडी ते रिंगरोड भागात कोणाचाही मृत्यू झाला की गेल पहिला फोन तात्यांना येतो. तात्या वेळ, काळ न बघता अशा कामात तत्काळ मदतीला धावून जातात. कोणी त्यांना याबद्दल विचारले की तात्यांचं ठरलेलं वाक्य हमखास कानी पडणारच,'...शेवटच्या घडीला आपण त्याला साथ दिली न्हाई तर आजवर त्यानं मला तोंडभरून हाक मारलेल्या त्या हाकेला काही अर्थ राहील का?' त्यांची माणुसकी आणि समाजाबद्दल असलेले प्रेम व आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा उत्साह आजच्या तरुण पिढीला दिशा देणाराच म्हणावा लागेल.
यामागे तात्यांचे कोणतेही राजकीय कारण नाही, कोणताही स्वार्थ नाही की कसली कधी अपेक्षा नाही. गिरणीतून मिळणार्या रोजच्या कमाईतून एक ठराविक वाटा अशा कामांसाठी तात्यांनी काढलेला असतोच.
सकाळी ७ ची वेळ. कोणा एका गल्लीतल्या अंत्ययात्रेसोबत त्या व्यक्तीच्या अंत्यदर्शनासाठी पंचगंगा घाटावर गेलेल्या फक्त मिठारी तात्यांनाच त्या पोराची हुडहुडी जाणवली. इतक्या लोकांनी इतकी वर्षे अशी अनेक दृष्य पाहिली असतील, पण वाईट वाटून तत्काळ कृती करण्याची भूतदया फक्त तात्यानीच दाखवली आणि त्यांनी तेथे तत्काळ गरम पाण्यासाठी सोलर बसविला. हेच खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन म्हणावे लागेल. देव माणसातही आहे, तात्यांच्या या कामगिरीतून याचाच खऱ्या अर्थाने प्रत्यय आल्याचे सिद्ध झाले आहे.
यामागे कोणतीही राजकीय भावना नाही की कशाची अपेक्षा नाही. फक्त मला झालेली जाणीव आणि माणुसकीच्या भावनेतून मी हा प्रयत्न केलेला आहे. पंचगंगा स्मशानभूमीत बसवलेला हा सोलर वॉटर हिटर सर्वांच्या उपयोगी पडावा, हीच यापाठीमागची भावना आहे.
संभाजी पांडुरंग जाधव,
(मिठारी तात्या), फुलेवाडी.