समाजातील अनिष्ट रूढी संपवा : जिल्हा न्यायाधीश र. ना. बावनकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:47 AM2020-02-22T00:47:29+5:302020-02-22T00:49:58+5:30
प्रा. मिलिंद दांडेकर यांनी, ज्या तृतीयपंथींना आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करावयाचे आहे, त्यांच्यासाठी नाईट कॉलेजमध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
इचलकरंजी : समाजात प्रवाहित होण्यासाठी तुमच्यात परिवर्तन आवश्यक आहे. ‘पायगुण’ हा शब्द बाजूला करून ‘कर्तृत्व’ हा शब्द अंगीकृत करा. अनिष्ट रूढी संपवून टाका. त्यानंतर समाज नक्कीच तुम्हाला पाठबळ देईल. त्यातून मिळालेल्या कामात विश्वास निर्माण करा. त्यामुळे तुमचे प्रश्न सुटतील, असा विश्वास जिल्हा न्यायाधीश र. ना. बावनकर यांनी तृतीयपंथींना दिला.
तृतीयपंथीयांना समाजात प्रवाहित करून त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आयोजित विधि साक्षरता शिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
हातकणंगले तालुका विधि सेवा समिती इचलकरंजी, कन्या महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना व रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. बावनकर म्हणाले, तुम्हाला समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी या समाजातील अनेक संस्था, व्यक्तींनी पुढाकार घेऊन काम दिले आहे. त्या कामात विश्वासार्हता व प्रामाणिकपणा जोपासून संबंधितांना न्याय द्या. मिळालेले काम टिकवून ठेवा, असे आवाहन केले. यावेळी दिवाणी न्यायाधीश ए. पी. कोकरे व सरदिवाणी न्यायाधीश एस. ए. खलाने यांनी सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांसाठी लागू केलेल्या कायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, उद्योगपती मदन कारंडे, डॉ. प्रशांत कांबळे,आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. मिलिंद दांडेकर यांनी, ज्या तृतीयपंथींना आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करावयाचे आहे, त्यांच्यासाठी नाईट कॉलेजमध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
अनेकांनी केली काम देण्याची घोषणा
राज्यात सर्वप्रथम वस्त्रोद्योगाने या उपक्रमाला तत्काळ प्रतिसाद देत कायदेविषयक मार्गदर्शनासह तृतीयपंथींना काम मिळवून देण्यासाठी अनेक संस्था, संघटना पुढे आल्या. त्यांनी आपापल्यापरीने कितीजणांना काम देणार, याबाबत घोषणा केली. त्यामुळे नक्कीच सामाजिक बदल घडेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.
मला व्यक्त व्हायचंय
दररोज तीच दुकाने, तोच बाजार, तीच टाळी आणि तीच दहाची नोट याचा कंटाळा आला आहे. आम्हालाही सन्मानाने जगायचे आहे. नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा समाजात मिसळून राहायचे आहे, असे भावनिक मनोगत प्रिया ऊर्फ प्रशांत सवाईराम यांनी व्यक्त केले, तर नगरपालिकेने तृतीयपंथीयांचा
२५ लाख रुपयांचा निधी तांत्रिक बाबी पुढे करत देण्यास टाळाटाळ करण्याऐवजी त्यातून तृतीयपंथीयांना उद्योग, व्यवसाय व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन सकीना यांनी केले. ‘मला व्यक्त व्हायचंय’ या टॅगलाईनखाली तृतीयपंथी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.